बेवारस चिमुकलीची माता पोलिसांच्या ताब्यात!
By Admin | Published: March 1, 2016 01:25 AM2016-03-01T01:25:49+5:302016-03-01T01:25:49+5:30
देऊळगावराजा बसस्थानकावर दहा दिवसांच्या मुलीला टाकून दिले होते. या घटनेची जालना येथे होणार डीएनए चाचणी.
देऊळगावराजा (बुलडाणा) : येथील बसस्थानकावर बेवारस दहा दिवसांच्या मुलीला टाकून दिल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत असताना पोलिसांच्या प्रयत्नाला गुप्त माहितीच्या आधारे यश प्राप्त झाले. घटनेच्या तिसर्या दिवशी देऊळगाव राजा पोलिसांनी त्या चिमुकलीच्या निर्दयी मातेला शोधून काढण्यात यश मिळविले आहे. संजीवनी तुकाराम भंडारे (वय २७)असे त्या मातेचे नाव आहे.
जालना जिल्ह्यातील मारोती शिरपुरे यांची मुलगी संजीवनी हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी तुकाराम किसन भंडारे रा.भुतेगाव, जि.जालना याच्यासोबत झाला. या काळात भंडारे दाम्पत्याला प्रीती, ऐश्वर्या व अंजली या तीन मुली झाल्या. संजीवनी ही चवथ्यांदा गरोदर होती. १७ फेब्रुवारी २0१६ रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात तिची प्रसूती होऊन मुलगी झाली. अडीच ते तीन वर्षांपूर्वी खडकपूर्णा धरणात मासेमारी करण्यासाठी भंडारे दाम्पत्य देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथे आलेले असून, सध्या त्यांचे वास्तव्य गव्हाण येथेच आहे. प्रसूतीच्या दहा दिवसानंतर संजीवनी दहा दिवसाच्या नवजात मुलीला घेऊन बदनापूरवरून २७ फेब्रुवारीला निघून दुपारी देऊळगावराजा बसस्थानकावर उतरली. गर्दीचा फायदा घेत संजीवनीने नवजात मुलीला स्थानकामध्ये सोडून ती पसार झाली. बराच वेळ झाला ती परत न आल्याने व एकटेच नवजात बाळ बसस्थानकावरील प्रवाश्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.