पहिल्या अपत्यासाठी मिळणार मातांना पाच हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:04+5:302021-09-03T04:36:04+5:30
तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे अनुदान मातृवंदना योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला, तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या ...
तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे अनुदान
मातृवंदना योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला, तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. गर्भवतींना पाच हजार रुपये पंतप्रधान मातृवंदन योजनेंतर्गत देण्यात येतात. हे पाच हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांत गरोदर महिलेची ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये देण्यात येतात. दुसऱ्या टप्प्यात प्रसवपूर्व तपासणी केल्यावर गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये गर्भवतींना दिले जातात. प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हेपॅटायटिस बी व लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर अखेरच्या तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
असे आहेत पात्रतेचे निकष
या योजनेंतर्गत सर्व गरोदर व स्तनदा माता यांना लाभ अनुज्ञेय आहे; परंतु ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत अशा मातांना लाभ अनुज्ञेय नाही. ज्या माता अशा प्रकारचे लाभ इतर कोणत्याही कायद्यान्वये घेत असतील त्यांनाही हा लाभ दिला जात नाही. सर्व गरोदर माता व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी हा लाभ देता येईल. गरोदरपणाची तारीख व पात्र लाभार्थ्यांची स्थिती ही एम.सी.पी. कार्डवर नोंदविलेल्या मासिक पाळीनुसार गृहीत धरण्यात येईल. गर्भपात किंवा उपजत मृत्यू असेल, तर पात्र लाभार्थीस एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. एखाद्या वेळेस गर्भपात किंवा उपजत मृत्यू झाल्यास त्या पात्र लाभार्थीस या योजनेतील लाभाचे उर्वरित हप्ते पुढील गरोदरपणामध्ये देता येतील.
लाभासाठी येथे करावा संपर्क
शहर- ग्रामीणमधील शासकीय, खासगी रुग्णालयातून हा लाभ दिला जाणार आहे. तरी सर्व गरोदर मातांनी जवळच्या आरोग्य केंद्रात नाव नोंदवून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.