गणेश मूर्तिकारांसमोर यंदाही अडचणींचा डोंगर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:13+5:302021-08-29T04:33:13+5:30
सुधीर चेके पाटील चिखली : गतवर्षी कोरोना व लॉकडाऊन आणि गणेशोत्सवाबाबत उशिरा जाहीर झालेल्या नियमावलीमुळे मूर्ती निर्मितीचे आगार म्हणून ...
सुधीर चेके पाटील
चिखली : गतवर्षी कोरोना व लॉकडाऊन आणि गणेशोत्सवाबाबत उशिरा जाहीर झालेल्या नियमावलीमुळे मूर्ती निर्मितीचे आगार म्हणून ओळख असलेल्या चिखलीतील मूर्तिकारांना मोठा फटका बसला होता. व्यवसायात ६० टक्के तूट व नुकसान सोसावी लागली. ही तूट यंदा भरून निघेल या आशेवर असतानाच यंदाही गणेशोत्सवाबाबतची नियमावली जाहीर होण्यास उशीर झाल्याने आणि मूर्तींच्या उंचीवर बंधने असल्याने सलग दुसऱ्या वर्षी येथील मूर्तिकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांचीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तिकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गतवर्षीही सरकारने गणेशोत्सवावर बंधने घातली होती. त्यामुळे बनवून तयार असलेल्या मोठ्या उंचीच्या मूर्ती तशाच पडून राहिल्या. सोबतच गणेश मूर्तींची मागणी तब्बल ६० टक्क्याने कमी झाली होती. परिणामी येथील गणेशमूर्तींची निर्मिती व विक्री करणाऱ्या मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले होते. गणेश, देवी, गौरी आदी देवी-देवतांच्या मूर्ती तयार करणारे चिखलीत ११ कारखाने आहेत. यावर सुमारे १५० कारागिरांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गतवर्षी नुकसानीची झळ सोसलेल्या या कारागिरांना यंदा काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. प्रामुख्याने गणेश मूर्तीच्या उंचीवरचे बंधन हटवण्याची प्रतीक्षा होती. मात्र, गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात मूर्तीच्या उंचीवरचे बंधन कायम ठेवण्यात आल्याने मूर्तिकारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. यंदा येथील कारखान्यातून मोठ्या मूर्ती अगदीच नगण्य प्रमाणात बनविण्यात आल्या आहेत. घरगुती लहान मूर्तींवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्या मूर्तींचेही प्रमाण मर्यादित ठेवले आहे. तर येथून ठोक स्वरूपात मूर्तींची ऑर्डर देणारे विविध जिल्ह्यातील व्यापारी देखील संभ्रमात असल्याने नियमित व्यापाऱ्यांनी देखील मर्यादित मूर्तींचीच ऑर्डर नोंदविली आहे. त्यानुसार येथील कारखान्यात चार फूट उंचीच्या आतील मूर्ती बनविण्याचे काम दिवसरात्र सुरू असून ऑर्डरनुसार अनेक मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार व्यस्त असल्याचे दिसून आले.
ऐनवेळी मूर्तींची टंचाई भासणार !
येथील कारखान्यात निर्मित मूर्तींना औरंगाबाद, जालना, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांतून दरवर्षी मागणी असते. त्यानुसार दरवर्षी नियोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर सर्वच मूर्तिकारांनी यंदा मर्यादित प्रमाणातच मूर्तींची निर्मिती चालविली असल्याने चिखलीतील मूर्तिकारांकडे यंदा बीड, सिल्लोड, भोकरदन, मंठा, जिंतूर, परभणी, मलकापूर या भागातील नवीन व्यापाऱ्यांनी मूर्तींची ऑर्डर नोंदविली आहे. त्यामुळे ऐनवेळी मूर्तींची टंचाई भासणार आहे.
कोरोनामुळे व्यवसायावर संकट आले आहे. त्याला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. या संकटातून मार्ग काढत असताना यंदा इतर जिल्ह्यातील नवीन व्यापारी जोडले गेले ही बाब मात्र काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे. तसेच यावेळी मूर्ती कमी प्रमाणात बनविल्या असल्याने ऐनवेळी मूर्ती कमी पडण्याची शक्यता आहे.
संजय पेंढारकर, विधाता आर्ट, चिखली
गतवर्षी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने वर्षभराचे गणित बिघडले. यावर्षीही कोरोनाचे संकट आहेच. त्यात गतवर्षाप्रमाणेच यंदाही सरकारने नियमावली उशिराने जाहीर केली आहे. त्यामुळे हाती केवळ बारा-तेरा दिवसच आहेत. इतक्या कमी कालावधीत मूर्तींची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. त्यात केंद्र सरकारच्या पीओपी मूर्ती संदर्भातील आदेशाने मूर्तिकारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
कैलास पेंढारक, मूर्तिकार तथा मूर्तिनिर्मिती केंद्रचालक, चिखली