जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम!
By admin | Published: June 6, 2017 12:08 AM2017-06-06T00:08:38+5:302017-06-06T00:08:38+5:30
शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद; ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. ५ जून रोजी जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तर काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला.
सकाळच्या सुमारास विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगाराने बस बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास बस सुरू करण्यात आल्या. देऊळगावराजा आणि देऊळगावमही येथील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपला सहभाग नोदविला, तसेच तालुका बंद ठेवण्यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला तालुक्यातील देऊळगावमहीसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आम आदमी पक्षासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी केली. शेतकरी दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहेत.
या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, या संपात विविध बडे राजकीय पक्ष पाठिंबा देत उतरले आहे. त्यामुळे हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होऊन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाभर पोलीस बंदोबस्त होता.
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
देऊळगावमही येथे शेतकरी संपाला भाजपा सोडून सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, तसेच येथील व्यापारी दुकाने बंद ठेवली. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी भाग घेतला. येथील व्यापाऱ्यांनीही संपाला पाठिंबा दिला. सकाळी ८ ते ११ पर्यंत जालना चिखली रोडवर चक्का जाम करण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
काँग्रेसने दिले निवेदन
शेतकऱ्यांच्या संपाबाबत काँग्रसने निवासी उपजिल्हाकारी यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जि. प. सदस्य जयश्री शेळके, संतोष आंबेकर, समाधान हेलोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.