खामगाव नगर पालिकेत पॅथर सेनेचे अर्धनग्न आंदोलन
By अनिल गवई | Published: July 28, 2023 03:30 PM2023-07-28T15:30:23+5:302023-07-28T15:30:42+5:30
शंकर नगरातील मुलभूत समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी
खामगाव: स्थानिक शंकर नगर भागातील मुलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी पॅथरसेनेने एल्गार पुकार आहे. पालिका प्रशासनाच्या दप्तर िदरंगाई विरोधात शुक्रवारी दुपारी २ वाजता अर्ध नग्न आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे खामगाव पालिकेत एकच गोंधळ उडाला होता. या प्रकाराची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस पालिकेत धडकले होते.
यावेळी पालिका मुख्याधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, खामगाव शहरातील शंकर नगर, रमाई नगर भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन देण्यात आले. यात स्ट्रीट लाईट, पेवर ब्लॉक बसविणे, शंकर नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरूस्ती, वाढीव पाणी पुरवठा योजनेतंर्गत घरोघरी नळ जोडणी, नाल्या आणि चेंबरच्या स्वच्छतेचा समावेश आहे. उपरोक्त मागण्यांच्या सोडवणुकीसाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, पालिका प्रशासनाने कोणतीही मागणी पूर्ण न केल्यामुळे पॅथर सेनेच्यावतीने तालुकाध्यक्ष अजय गवई यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी चक्क पालिकेत ठिय्या देत, अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रतिक वानखडे, निखिल गवई, वैभव गवई, प्रेम वानखडे, अभिजीत गव्हांदे, सागर चोपडे, मुन्ना गवई, रवि सुर्वे, धम्मभूषण दमदाळे, गौरव उमाळे, अजय इंगोले, भूषण सावदेकर आदींनी सहभाग दिला. यावेळी गीता इंगळे, अन्नपूर्णा शेजव, मीना खोळके, रंजना इंगळे, संगिता मोरे, रूपाली शेगोकार यांच्यासह शंकर नगर, रमाई नगरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आंदोलन आक्रमक, दुभाभावाचा आरोप
खामगाव नगर पालिकेत मुख्याधिकारी हजर राहत नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळला असून, विकास कामे करताना दूजाभाव केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी पॅथर सेनेच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, मुख्याधिकारी पालिकेत येऊन आंदोलन सोडविणार नाहीत, तो पर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्राही या आंदोलकांनी घेतला होता. आंदाेलन तापले असतानाच शहर पोलीस पालिकेत पोहोचले होते.