पटवारी संघटनेचे आंदोलन
By admin | Published: April 13, 2016 01:09 AM2016-04-13T01:09:29+5:302016-04-13T01:09:29+5:30
काळय़ा फिती लावून छेडले आंदोलन.
चिखली (जि. बुलडाणा): जिल्हय़ातील तलाठय़ांच्या विविध मागण्यांसदर्भात महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनस्तरावर दखल घेतली जात नसल्याने ११ एप्रिलपासून पटवारी संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. यानुषंगाने ११ एप्रिल रोजी सर्व तलाठी व मंडळ अधिकार्यांनी काळय़ा फिती लावून महसुली कामे कायमस्वरूपी बंद करून आंदोलन छेडले आहे.
स्थानिक तहसील कार्यालयात विदर्भ पटवारी संघाच्या चिखली शाखेच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त तहसीलदार विजय लोखंडे व पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विकास कस्तुरे यांनी केले तर बुलडाणा उपविभाग सचिव सुनील डव्हळे यांनी आंदोलनातील टप्पे व मागण्यांबाबत माहिती दिली.