कोराडी येथील मत्स्यबीज केंद्राच्या नुतनीकरणासाठी हालचाली ; केंद्राच्या समितीने केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:32 PM2018-04-05T18:32:53+5:302018-04-05T18:33:49+5:30
बुलडाणा : मत्स्यजिरे निर्मितीमध्ये विदर्भात आघाडीवर राहलेल्या कोराडी येथील मत्स्यबीज केंद्राच्या नुतनीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या केंद्राचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या एका समितीने नुकतीच या केंद्राची पाहणी केली आहे.
नीलेश जोशी
बुलडाणा : मत्स्यजिरे निर्मितीमध्ये विदर्भात आघाडीवर राहलेल्या कोराडी येथील मत्स्यबीज केंद्राच्या नुतनीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या केंद्राचे नुतनीकरण करण्यात येणार असून त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या एका समितीने नुकतीच या केंद्राची पाहणी केली आहे. जवळपास ३५ वर्षापासून हे मत्स्यबीज केंद्र कार्यान्वीत असून आता या केंद्राच्या नुतनीकरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने २०१८ अखेर पर्र्यंत या केंद्राचे नुतनीकरण अपेक्षीत असून त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक या केंद्राचे नुतनीकरण हे गेल्यावर्षीच होणे अपेक्षीत होते. मात्र त्यात दिरंगाई झाल्याने केंद्राच्या समितीने येथे येऊन पाहणी केली. येथील एकंदर स्थितीचा सर्व्हेही या समितीने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासंदर्भातील अंदाजपत्रकही मागविण्यात आले आहे. या केंद्रातील हॅचरीची जलवाहीनी कालबाह्य झाली आहे. त्या जागी सीपीव्हीसी किंवा एचडीपी पाईप टाकण्यात येणार असून अन्य कामेही येथे करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १८ ते २० कोटी रुपयांची मत्स्य व्यवसायात वार्षिक उलाढाल होत असून ११ हजार मत्स्य व्यावसायिकांचा उदरनिर्वाह यावर चालतो. जिल्हयातील ५२० तलावातून मत्स्योत्पादन घेण्यात येते. त्यासाठी लागणारे मत्स्यबीज कोराडी येथील या केंद्रातूनच पुरविण्यात येते. ऐवढेच नव्हे तर येथे निर्मित मत्स्यबीज हे जळगाव, धुळे, अमरावती व वाशिम जिल्ह्याला पुरविण्यात येते. सोबतच अमरावती जिल्ह्यातील मांडवा (धारणी येथील) संवर्धन केंद्रामध्येही त्याचा पुरवठा करण्यात येतो. परिणामी शासनास मोठा महसलू मिळवून देण्याच्या दृष्टीने कोराडी येथील मत्स्यबीज केंद्र जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून त्याच्या नुतनीकरणार प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मत्स्यजिरे निर्मितीच्या उदिष्ठाला फटका
दरवर्षी पाच कोटी मत्स्य जिरे निर्मिती करणार्या कोराडी येथील केंद्राची जीर्ण स्थिती आणि तापमान वाढीचा फटका मत्स्यजिरे निर्मितीच्या उदिष्ठाला बसला आहे. परिणामी यावर्षी अवघी चार कोटी ७५ लाख मत्स्यजिरे निर्मिती झाली त्यापोटी १८ लाखांचा महसूल जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाला. सायप्रीन्स पासूनही ८० हजारांचा महसूल मिळाला आहे. कधी काळी उच्चांकी मत्स्यजिरे निर्मिती करणार्या या केंद्राच्या संवर्धनाच्या दृष्टीने गांभिर्याने प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.
तीन संवर्धन केंद्रांचा प्रश्नही रखडला
बुलडाणा जिल्ह्यात पेनटाकळी, नळगंगा आणि खडकपूर्णा या तीन प्रकल्पावर संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहेत. २०१४ पासून हा प्रश्न प्रलंबीत असून त्यादृष्टीने अद्याप मत्स्य व्यवसाय विभागाकडून अपेक्षीत हालचाली झालेल्या नाही. मत्स्यव्यवसाय आयुकतांच्या देखरेखीत हे का होणे अपेक्षीत आहे. मात्र या संवर्धन केंद्राबाबत अपेक्षीत हालचाल झालेली नाही. नळगंगा परिसरात मुरमाड जमीन असली तरी काळी माती टाकून या संवर्धन केंद्राची उभारणी केली जाऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.