क्रीडा व कला शिक्षकांचे आंदोलन
By admin | Published: May 31, 2017 12:31 AM2017-05-31T00:31:43+5:302017-05-31T00:31:43+5:30
बुलडाणा : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयावरील तासिका विभागांतर्गत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी क्रीडा व कला शिक्षक संघटना व सहयोगी शिक्षक संघटना यांनी २९ मे रोजी धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयावरील तासिका विभागांतर्गत झालेला अन्याय दूर करण्याची मागणी क्रीडा व कला शिक्षक संघटना व सहयोगी शिक्षक संघटना यांनी २९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आयुक्त (शिक्षण) तथा संचालक, विद्या प्राधिकरण यांचे २८ एप्रिलच्या पत्रानुसार प्रत्येक मुलांमधील क्षमता ओळखून ती वाढविण्याच्या दृष्टीने नव्याने विषयवार तासिका नियोजन लागू करण्यात आलेले आहे. या नियोजनानुसार कला व शारीरिक शिक्षण विषयाचा ५० टक्के कार्यभार कमी करण्यात आलेला आहे. ही बाब या शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येकी ८ टक्के कार्यभारानुसार प्रत्येक विषयासाठी ४ तासिका देणे आवश्यक आहे, असे असताना ५० तासिकांवरुन ४५ तासिका केल्यामुळे या तीनही विषयांच्या कार्यभारात अन्यायकारक कपात करण्यात आलेली आहे. यामुळे शाळेत सेवेत असलेल्या या विषयांच्या शिक्षकांना कोणता कार्यभार द्यावा, हा प्रश्नदेखील प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे. इतर विषय अध्यापनासाठी या शिक्षकांना दिल्यास त्यामुळे प्रचंड शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर परिपत्रक रद्द करून संघटनेने केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी विविध आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.