चार लिक्विड ऑक्सिजन टँकसह जंबो हॉस्पिटल उभारण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:58+5:302021-03-19T04:33:58+5:30
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता ४५०० च्या आसपास असून, आरोग्य विभागाची ३,६३० खाटांची एकूण क्षमता पाहता, सध्या खाटा कमी ...
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता ४५०० च्या आसपास असून, आरोग्य विभागाची ३,६३० खाटांची एकूण क्षमता पाहता, सध्या खाटा कमी पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तातडीने बुलडाण्यात सुविधायुक्त जंबो रुग्णालय उभारण्यात यावेत, असे निर्देशच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. त्याअनुषंआने आरोग्य, महसूल यंत्रणेने आपशी समन्वय ठेवून त्वरित जागेचा शोध घ्यावा व अल्पावधीत हे जम्बो रुग्णालय उभारावे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त तालुकानिहाय किमान एक कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही त्वरित आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षापासून यासंदर्भातील प्रस्तावावर मंथन सुरू असून, आता तब्बल सहा ते सात महिन्यांनंतर हा विषय पुन्हा छेडला गेला आहे. त्यामुळे यासंदर्भात गांभीर्यपूर्वक यंत्रणांनी हालचाल करावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
- खामगावसह चार ठिकाणी ऑक्सिजन टँक उभारणार-
सक्रिय रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनामुळे दुर्धर आजार व वयोवृद्धांचे गेल्या एक महिन्यात ५० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी ऑक्सिजनची उपलब्धता महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्याअनुषंगाने खामगाव, शेगाव, मलकापूर आणि देऊळगाव राजा येथे लिक्विड ऑक्सिनज टँक उभरण्याच्या त्वरित हालचाली सुरू करण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक ती परवानगी तातडीने घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आरोग्य विभागास सांगण्यात आले. बुलडाणा येथे २० केएलचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू झाला आहे. त्याच धर्तीवर उपरोक्त चार ठिकाणीही तो सुरू करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले. परिणामी सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.