कोविड हॉस्पिटल विस्ताराच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:39+5:302021-04-14T04:31:39+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, ...
जिल्हाधिकारी कार्यालयात १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे, बुलडाण्याचे तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
--टंचाई दूर करण्यासाठी पर्यायी ऑक्सिजन टँक--
वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता निर्माण होत असलेली ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये आणखी एक २० केएलचे ऑक्सिजन टँक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचे कामही प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. कोविड हॉस्पिटलच्या विस्तारित भागात ऑक्सिजन पुरवठा करण्यासही या टँकची उपयुक्तता राहील.
--आणखी चार टँक निविदा प्रक्रियेत--
गेल्या महिन्यात देऊळगाव राजा, शेगाव, मलकापूर आणि खामगाव येथे प्रत्येकी २० केएलचे लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हा प्रशासनास निर्देश दिले होते. त्यानुषंगाने या चारही ठिकाणची आनुषंगिक प्रक्रिया निविदास्तरावर आली आहे. यातील खामगाव येथील लिक्वीड ऑक्सिजन टँक येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
--जम्बो हॉस्पिटलला पर्याय--
बुलडाण्यात ५०० खाटांचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात मध्यंतरी चाचपणी करण्यात आली होती. मात्र त्याला लागणारा कोट्यवधींचा खर्च पाहता कोविड हॉस्पिटलचे तात्पुरत्या स्वरुपात विस्तारीकरण करून अपंग विद्यालय आणि क्षय आरोग्यधाम येथे ऑक्सिजन सुविधा असलेले १८० बेड्स उपलब्ध करण्यात येत असून, सुमारे १५ ते २० लाख रुपयांमध्ये हे काम मार्गी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.