वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:09 PM2020-10-13T13:09:51+5:302020-10-13T13:10:20+5:30
१३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली आरोग्य व जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
- संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाचा आलेख घसरत असला तरी दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली आरोग्य व जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची आवश्यकता असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
खबरदारीचा उपाय म्हणून अतिजोखीम गटातील रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावे याकरीता अकोला येथील प्लांटमधून ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात येतात. वाशिम जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट नसल्याने आगामी काळात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आॅक्सिजन प्लांटची मागणी समोर आली. १० आॅक्टोबर रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाशिम येथे ‘आरटी-पीसीआर’ प्रयोगशाळेच्या ई-उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा (१० हजार लिटर) लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला दिल्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीमधून वाशिम येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या.
लिक्विड ऑक्सिजन प्लांटसंदर्भात आरोग्य मंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केली जात आहे. यापूर्वी जेथे प्लांट उभारण्यात आले, तेथून वर्कऑर्डर मागविण्यात येत आहेत.
- डॉ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम