बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:59 PM2020-12-25T12:59:02+5:302020-12-25T12:59:13+5:30
Medical College : आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथे प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून २३ डिसेंबर रोजी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली.
बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मध्यंतरी तीन सदस्यीय समितीनेही पाहणी केली होती. शहरातील तीन जागांची पाहणी करण्यात आली होती. सुमारे ४५० कोटी रुपये बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भाने आमदार संजय गायकवाड यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी चर्चा केली.
त्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आ. संजय गायकवाड यांनी यापूर्वी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती. आता आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी यांची या प्रश्नी भेट घेतल्यामुळे बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.