श्री गणेशाचे आज विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:37 PM2017-09-04T23:37:32+5:302017-09-04T23:41:39+5:30
मागील १२ दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, ५ सप्टेंबर रोजी तगडा बंदोबस्त राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव : मागील १२ दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, ५ सप्टेंबर रोजी तगडा बंदोबस्त राहणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी ९२४ ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला. ५ सप्टेंबर रोजी गणेशाला निरोप देण्यात येणार असल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांत तसेच जिल्ह्यातील विविध मोठय़ा शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्या खामगावातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याची जय्यत तयारी विविध गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन मेहनत घेत असून, मिरवणुकीच्या नियंत्रणाकरिता यंत्रणा सज्ज झाली आहे. मंडळांची मिरवणुकीतील क्रमवारीसुद्धा सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. विसर्जन मार्गावर आठ ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यावरून पोलिसांच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले असून, त्याठिकाणी आजपासूनच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीदरम्यान जागोजागी पोलीस तैनात राहणार आहेत. यावर्षी ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीतील वाद्यांची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्र राहणार आहे. वाद्यांच्या आवाजाची र्मयादा ओलांडणार्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी विशेष पोलीस कुमक तैनात राहणार आहे. निर्मल टर्निंग ते राणागेट व बोरीपुरा भागात कलम १४४ लागू राहील. मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक एक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी तीन, पोलीस निरीक्षक ३१, उप पोलीस निरीक्षक १५0, पोलीस कर्मचारी २३८0, होमगार्ड एक हजार, एसआरपी एक कंपनी, दारूबंदीचे सात अधिकारी, २८ कर्मचारी, वन विभागाचे ५0 कर्मचारी तसेच पोलीस मित्रांचा समावेश राहणार आहे.
-