दुष्काळात १३ हजार मजुरांना ‘मनरेगा’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 03:22 PM2019-03-08T15:22:50+5:302019-03-08T15:23:18+5:30
मोठ्या शहरात होणारे मजुरांचे स्थलांतराच्या पृष्ठभूमीवर मनरेगाच्या कामावर आजघडीला तब्बल १३ हजार मजूर कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: सातत्याने अवर्षणाचा फटका बसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १२०० गावे टंचाईच्या विळख्यात अडकलेली असतानाच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या शहरात होणारे मजुरांचे स्थलांतराच्या पृष्ठभूमीवर मनरेगाच्या कामावर आजघडीला तब्बल १३ हजार मजूर कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
परिणामस्वरुप दुष्काळाची वाढती दाहकता यावरून अधोरेखीत होत आहे. त्यातच एप्रिल-मे महिन्यात संभाव्या चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात १८ चारा छावण्या प्रस्तावीत करण्यात आल्याने एप्रिलनंतर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होण्याची भीती आहे. खरीपा पाठोपाठ रब्बीचा हंगामही दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्यामुळे मजुरांच्या हाताला अपेक्षीत असे काम सध्या जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे मनरेगाच्या कामाकडे मजुरांचा ओढा वाढल्याचे चित्र सकृत दर्शनी दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची चाहूल लागलेली असतानाच मनरेगाच्या कामावर तब्बल सात हजार मजूर कार्यरत होते. त्यात तीन महिन्यात तब्बल पाच हजार मजुरांची वाढ झालेली आहे. त्यावरून वरकरणी अलबेल वाटणार्या बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकताही आता गंभीर स्वरुप धारण करण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दुष्काळी स्थिती पाहता दीडशे दिवस रोजगार उपलब्ध करून दिला असून त्यानंतर राज्य शासनही आणखी १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात तीन वेळा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे रोहयोच्या कामावर सातत्याने मजूर संख्या दिसत आहे. आता अवर्षणाची स्थिती पाहता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात वृक्ष लागवड, रोपवाटिका, घरकूल आणि सिंचन विहीरींच्या कामावर प्रामुख्याने मजूर वर्ग असून रोपवाटिका, वैयक्तिक गोठ्याची कामे, शौचालयाचे बांधकाम, तुती लागवडीच्या कामावर प्रामुख्याने ही हेजरी दिसून येत आहे. जिल्ह् यातील ९०० ग्रामपंचायतींपैकी ५६६ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सध्या कामे सुरू आहेत. त्यावर सध्या हे १३ हजार १४८ मजूर आहेत. पैकी एक हजार ८५ मजुरांकडे अद्याप जॉब कार्ड नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
६९ कोटींचा खर्च
मनरेगातंर्गत सध्या सुरू असलेल्या कामावर ६९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून यातील ४६ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च हा अकुशल कामावर झाला असून कुशूल कामावर नऊ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झालेले असून उर्वरित खर्च हा प्रशासकीय कामावर झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ५६६ गावात दोन हजार १८ कामे उपलब्ध करून देण्यात आली असून मागणीनुसारही मजुरांना कामे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मेहकर, लोणारमध्ये चार हजार मजूर
बुलडाणा जिल्ह्यात जुना इतिहास पाहता प्रामुख्याने मेहकर व लोणार तालुक्यातून सूरत, औरंगाबाद, पुणे, नाशिक येथे मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. रोहयोतंर्गतच्या कामावरील मजुरी न मिळाल्यामुळे यात भागातील पाच जणांच्या आत्महत्या झाल्याचे प्रसारमाध्यमांनी समोर आणले होते. यातील काही मजूर हे परजिल्ह्यात कामावर होते. दरम्यान, त्या पृष्ठभूमीवर येथील स्थितीची माहिती घेतली असता या दोन्ही तालुक्यात वर्तमान स्थितीत तीन हजार ८८४ मजूर कामावर असल्याचे सुत्रांनी सांगितले. सर्वाधिक मजूर हे मेहकर तालुक्यात कामावर असून तेथे ५५ ग्रामपंचायतीतंर्गत दोन हजार ४९८ मजूर कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सहा तालुक्यात सर्वाधिक मजूर
खामगाव, लोणार, मेहकर, मलकापूर, नांदुरा आणि संग्रामपूर या सहा तालुक्यात प्रामुख्याने एक हजार पेक्षा अधिक मजूर कामावर आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळाची दाहकात दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकृत दर्शनी समोर येत आहे. या सहा तालुक्यात साडे आठ हजार मजूर कार्यरत असल्याचे प्रशासकीय पातळीवरील आकडेवारी सांगते.