१२ दिवसात २११ कोटी रुपये वसुलीचे महावितरणसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:38+5:302021-03-21T04:33:38+5:30
बुलडाणा : आर्थिक वर्ष समाप्तीला अवघे १२ दिवस उरले असून, या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातील विविध ग्राहकांकडून तब्बल २११ कोटी ...
बुलडाणा : आर्थिक वर्ष समाप्तीला अवघे १२ दिवस उरले असून, या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातील विविध ग्राहकांकडून तब्बल २११ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे. अकोला परिमंडळांतर्गत येणाऱ्या अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी ही एकट्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यामुळे महावितरणला या वसुलीसाठी कसब पणाला लावावे लागणार आहे.
विविध वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेणे आणि ती आपल्या ग्राहकांना देणे हा मुख्य व्यवसाय महावितरणचा असल्याने आपल्या ग्राहकांची विजेची सोय करण्यासाठी महावितरणला वेळोवेळी वीज निर्मिती-पारेषण कंपन्यांची देयके अदा करणे क्रमप्राप्त असते. मात्र, गेल्या ११ महिन्यांत महावितरणने केवळ उधारीवर वीज वितरीत केल्याने थकबाकी एवढी वाढली आहे. महावितरणसमोर त्यांचे व्यवहार चालविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. वीजपुरवठा खंडित करणे हे महावितरणसाठी क्लेशदायी आहे. मात्र, ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अकोला जिल्ह्यात १५८ कोटी ८९ लाख तर वाशिम जिल्ह्यात ७२ कोटी ६० लाख रुपये थकबाकी आहे. मात्र, एकट्या बुलडाणा जिल्ह्यात २११ कोटी रुपयांपर्यंत थकबाकी असल्याने सध्या महावितरणचे कर्मचारी ही थकबाकी वसूल करण्यासाठी मोठी कसरत करत आहेत. त्यामुळे महावितरणच्या सर्व ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
देयक वसुलीचा मोठा दबाव
महावितरण अंतर्गत असलेल्या विविध विभागांवर थकीत देयके वसूल करण्याचा मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी सध्या थेट घरोघरी जावून थकीत वीज देयक वसुलीसाठी सर्वप्रकारच्या ग्राहकांना गळ घालत आहेत. कार्यालयांतर्गतही सध्या यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून, प्रभावीपणे काम करून थकीत देयके वसूल करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने आढावा घेण्यात येत आहे.