इंधन भत्ता वाढीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:33+5:302021-08-13T04:39:33+5:30
महावितरण कंपनीच्या कामकाज व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ तांत्रिक कर्मचाऱ्यांना वाढीव इंधन भत्ता मंजूर करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीकडून ...
महावितरण कंपनीच्या कामकाज व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ तांत्रिक कर्मचाऱ्यांना वाढीव इंधन भत्ता मंजूर करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीकडून देण्यात आले होते. त्यानुसार २०१८ च्या वेतन करारात जीपीएस प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या वेतनात हा वाढीव भत्ता थेट जमा करण्याची स्पष्ट तरतूदही करण्यात आली. मात्र तीन वर्षे उलटूनही याबाबत अंमलबजावणी न झाल्याने अखेर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांनी ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान काळ्या फिती लावून कामकाज केले. ७ ऑगस्टपासून कंपनी व्यवस्थापनाविरोधात निषेधाचे बॅनर लावून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान पुढील टप्प्यात आणखी वेगळ्या पद्धतीने हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत प्रत्यक्षा या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, तोवर अशाच पद्धतीने हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत प्रशासनाचे वसुली व लाईन दुरुस्तीच्या बाबतीतील धोरण व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे वाढलेल्या जबाबदाऱ्या बघता लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वाजवीपेक्षा जास्त फिरावे लागत आहे. परिणामी त्यांना अतिरीक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. याबाबत महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
--आंदोलनात या कर्मचाऱ्यांचा सहभाग--
बॅनर निषेध आंदोलनात गणेश राणे, अण्णा जाधव, सौंदाजी वाघ, संतोष पाटील, अशोक जाधव, गोपाळराव वानखेडे, दत्तात्रय खाचणे, गौतम गवई, संदीप ठोसर, संतोष पवार, बी. एस. पवार, मधुकर विघ्ने, निंबाजी चौधरी, जगन्नाथ उबाळे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झालेले आहेत.