महावितरणचा बुलडाण्यातील तंत्रज्ञ निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:58 AM2021-03-17T11:58:38+5:302021-03-17T11:58:59+5:30
MSEDCL's technician suspended पवन माणिकराव मोरे यांना महावितरणचे संरक्षण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्याबुलडाणा शहर भाग एक मध्ये कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ पवन माणिकराव मोरे यांना महावितरणचे संरक्षण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले आहे. दरम्यान निलंबन काळात चिखली उपविभागीय कार्यालयामध्ये त्यांची बदली करण्यात आली असून आठवड्यातून तीन दिवस त्यांना हजेरी लावावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तंत्रज्ञ पवन माणिक मोरे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता कामावर सातत्याने गैरहजर राहणे, वीज देयकांची वसुली न करणे त्यामुळे अन्य जनमित्रांना ही जबाबदारी पार पाडावी लागणे यासह अन्य कारणावरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नंतर नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना कामावर हजर करून घेण्यात आले होते. त्याउपरही मोरे कामावर गैरहजर राहत असून भ्रमणध्वनीही बंद ठेवत आहेत. तसेच त्यांच्या अखत्यारितील भागात सुमारे २ लाख ३९ हजार रुपयांची वीज देयकेही थकीत असल्यामुळे बुलडाणा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता यांना देयकांची वसुली मोहीम राबवावी लागली होती. यासोबतच मोरे यांनी दोन ग्राहकांकडून चार हजार व पाच हजार रुपये वीज देयकाचा भरणा करण्यासाठी घेतलेले असतानाही ते कार्यालयात १२ मार्च पर्यंत जमा केलेले नाही. एकंदरीत मोरे यांची कार्यपद्धती पाहता त्यांना १६ मार्च रोजी महावितरणच्या संरक्षण व सुरक्षा विभागाचे (विभागीय कार्यालय) कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले आहे.