Mucormycosis : जीव वाचविण्यासाठी गमवावा लागला डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:54 AM2021-05-17T11:54:34+5:302021-05-17T11:54:41+5:30
Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा आजार होऊन एक उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागल्याची वेळ एका ६१ वर्षीय रुग्णावर आली.
- मनोज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनही देण्यात आली. रुग्णाने कोरोनावर मातही केली. नंतर मात्र डोळ्यासमोर अंधूकपणा जाणवायला लागल्याने चाचणीअंती म्युकरमायकोसिसचा आजार होऊन एक उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागल्याची वेळ एका ६१ वर्षीय रुग्णावर आली.
सद्य:स्थितीत या रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ही घटना मलकापुरात दीड महिन्याआधीच घडली, तरी या घटनेसंदर्भात कसलीच नोंद नसल्याने आरोग्य यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे.
कोरोनाची बाधा झाल्यामुळे जुन्या गावातील एका ६१ वर्षीय रुग्णास ३ मार्च रोजी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान रेमडेसिविरची इंजेक्शन त्यांना देण्यात आली. परंतु डोळ्याचा त्रास होत असल्याची बाब रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. कोरोनावर मात करीत ते घरी परतले. मात्र चार ते पाच दिवसात त्यांची तब्येत बिघडल्याने व डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवायला लागला. अहवालावरून त्यांच्या डोळ्यात काळी बुरशी दिसून आली. १ एप्रिल रोजी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीतेश टावरी यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून निकामी झालेला उजवा डोळा काढून टाकण्यात आला.
ही घटना तब्बल दीड महिना लोटला तरी आरोग्य यंत्रणेकडे त्याची नोंद नाही.
कोरोनानंतर वाढला मधुमेहाचा त्रास
कोरोना आजारावर वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. या औषधांमुळे रुग्णांच्या थेट डोळ्यावर व शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम दिसून येत आहे. मलकापुरातील रुग्णाला कोरोनाची बाधा होण्यापूर्वी मधुमेहाचा कसलाही त्रास नव्हता. तरीही उपचारानंतर रुग्णाची म्युकरमायकोसिसमुळे हा त्रास सुरू झाला आहे.