चिखलीत गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद; ८७ किलो गांजा जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:02+5:302021-09-16T04:43:02+5:30
चिखली येथे झाली कारवाई : वृत्तसंकलनास गेलेल्या पत्रकारांना दमदाटी व धक्काबुक्की चिखली : जालना येथून चिखलीमार्गे खामगावकडे जाणाऱ्या एका ...
चिखली येथे झाली कारवाई : वृत्तसंकलनास गेलेल्या पत्रकारांना दमदाटी व धक्काबुक्की
चिखली : जालना येथून चिखलीमार्गे खामगावकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी तब्बल ८७ किलो १७२ ग्रॅम गांजा जप्त करून तस्करी करणारी मोठी टोळी गजाआड केली आहे. मात्र, याबाबत स्थानिक पत्रकारांना माहिती मिळताच सदर ठिकाणी वृत्त संकलनास गेलेल्या पत्रकाराचा एलसीबीचे अधिकारी नीलेश शेळके यांनी मोबाईल हिसकावला तर पोलीस कॉन्स्टेबल दीपक वायाळ यांनी दमदाटी व धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी या कारवाईबाबत शंका उपस्थित होत आहेत.
चिखलीमध्ये १४ सप्टेंबर रोजी स्थानिक खामगाव चौफुलीवर सापळा रचून खामगावकडे जाणाऱ्या ट्रकमधून एलसीबीने १० लाख ४५ हजार ४४० रुपयांचा हा गांजा, ट्रक व मोबाईल असा २० लाख ५१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच गांजाची तस्करी करणारे राजू रामराव पवार (२०), सपना राजू पवार (१९, दोघे रा. शिवना, जि. अैारंगाबाद), सुषमा रोहिदास मोहिते (४०), यमुना आप्पा चव्हाण (३०, दोघे रा. कॉटन मार्केट जवळ मोताळा), सुरेश बाबूलाल (४२, रा. भवानी मंडी, राजस्थान) अआणि एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, मनीष गावंडे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, प्रकाश राठोड, दशरथ जुमडे, गणेश पाटील, विजय सोनोने, जयंत बोचे, संभाजी असोलकर, दीपक वायाळ, मधुकर रगड व चिखली पोलिस स्टेशनचे अमोल बारापत्रे, सायबर सेलेचे राजू आडवे यांनी केली.
--प्रासारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा मोबाईल हिसकावला--
या कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी शहरातील काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेले होते. दरम्यान, अनुषंगिक कारवाईची माहिती न देता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाच पीएसआय नीलेश शेळके, पोलिस कॉन्स्टेबल दीपक वायाळ यांनी दमदाटी केली. एका जवळील मोबाईलही हिसकावून घेत त्यातील छायाचित्रेही डिलिट केली. त्यामुळे एवढी मोठी कारवाई केल्यानंतरही प्रसारमाध्यमांना त्यापासून दूर ठेवण्यामागे स्थानिक गुन्हे शाखेचा नेेमका उद्देश काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.