खामगावच्या बाजारात मुगाची आवक वाढली!
By Admin | Published: September 24, 2016 02:24 AM2016-09-24T02:24:39+5:302016-09-24T03:20:57+5:30
खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक वाढली.
खामगाव(जि. बुलडाणा), दि. २३- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये मूग विक्रीसाठी आणणार्या शेतकर्यांची गर्दी वाढत चालली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यल्प पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न तीन वर्षांपासून निघालेले नाही. नगदी पीक असलेल्या मुगाला मागील दोन वर्षांत एकरी क्विंटलपर्यंतच उत्पन्न झाले. त्यावेळी बाजारात मुगाला भाव भरमसाठ होता. मात्र मुगाची आवकच नसल्याने शेतकर्यांचा फायदा झाला नाही. सन २0१४ व २0१५ या दोन्ही वर्षात खरीप हंगामात शेतकर्यांना उत्पन्नाचा फटका बसला, नेमक्या याच वर्षात मुगाचे भाव वाढलेले होते. दरम्यान, यावर्षी मुगाचे चांगले पीक आहे. खरीप हंगामात मुगाचे पीक बाजारात येताच व्यापार्यांनी मुगाचे भाव पाडले आहेत. मुगाच्या खरेदीसाठी शासनाने ५२२५ रुपये हमीभाव जाहीर केला. या हमीभावापेक्षा कमी भावाने मुगाची खरेदी होत असताना शासनाने शेतकर्यांच्या तक्रारीवरून हमीभावाने मुगाची खरेदी करण्याची अट घातली. तेव्हा ४८२५ या हमीभावाने खामगाव बाजार समितीत मुगाची खरेदी करण्यात आली. असे असतानाही मुगाचा दर्जा ठरवून पाच हजारांपेक्षा कमी भाव शेतकर्यांना दिल्या जात आहे. खामगाव बाजार समितीने शेतकर्यांचे हित लक्षात घेता कमी भावाने मूग खरेदी न करण्याबाबत व्यापार्यांना बजावले आहे. यापुढेही बाजार समितीने खरेदीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये नऊ हजारांचा भाव
उत्पादन कमी तर भाव जास्त, असेच सूत्र बाजारामध्ये तीन वर्षांपासून पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षांत अत्यल्प पावसामुळे मुगाचे उत्पादन घटले. मात्र, बाजारात मुगाचे भाव वाढले होते. खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २0१४ मध्ये सप्टेंबर महिन्यात मुगाला ७१२५ रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक भाव, तर सन २0१५ मध्ये याच महिन्यात ९१५0 रुपये सर्वाधिक भाव मिळाला आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुगाला मिळत असलेला भाव खूपच कमी आहे. शेतकर्यांना पैशाची गरज असल्याने नाईलाजास्तव मूग विकावा लागत आहे.
मागील तीन वर्षांतील मुगाची आवक (१५ ते २२ सप्टेंबरदरम्यान)
सन आवक (क्विंटलमध्ये)भाव (प्रतिक्विंटल)
२0१४ ४७0 ७१२५
२0१५ १२0५ ९१५0
२0१६ ५४१९ ५५५0