साखरखेर्डा परिसरात मुगाची तोडणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:37+5:302021-08-27T04:37:37+5:30
साखरखेर्डा परिसरात सोयाबीन, कपाशी नंतर मुगाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पाच वर्षांपूर्वी मुगाला १० हजार रुपये प्रती क्विंटल ...
साखरखेर्डा परिसरात सोयाबीन, कपाशी नंतर मुगाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पाच वर्षांपूर्वी मुगाला १० हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. तेव्हापासून शेतकरी मुगाचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. मागील वर्षी मुगाच्या शेंगा तोडणीला आलेल्या असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावला होता उभ्या मुगाला कोंब फुटले होते. संपूर्ण पीक सडले होते. तोडणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतात वखर फिरवावा लागला होता. मागील आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावून खरिपाच्या पिकाला जीवदान दिले. मूग भरणीला आला असताना आणि शेंगा काळ्या पडण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पावसाने उघाड देताच शेतकऱ्यांनी पाल गळण्यापूर्वीच मुगाच्या शेंगा तोडणीला सुरुवात केली आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यांनी पाच रुपये किलो तोडणीला भाव दिला असून महिलांना रोजगार मिळाला आहे. मुगाचा हमीभाव ८ हजार रुपये असल्याने प्रती एकर पाच ते सहा क्विंटल उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. किमान आठवडाभर मूग तोडणीला लागणार आहे.
मागील वर्षीचा हंगाम निसर्गाने हिरावला होता. यावर्षी ती परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आहे त्या परिस्थितीत मूग तोडणीला सुरुवात केली आहे.
बबनराव रिंढे,
शेतकरी मोहाडी.