रिमझिम पावसामुळे मुगाच्या शेंगांना उभ्या झाडावर फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:30+5:302021-08-23T04:36:30+5:30
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील ...
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या मुगाच्या शेंगा भरल्या आहेत. तर काही तोडणीला आल्या आहेत. या आठवड्यात रविवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने सुकन्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगांना उभ्या झाडावरच वाळलेल्यासह हिरव्या शेंगांना कोंब फुटत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन पिकाची दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने मूग-उडदासह सोयाबीनच्या झाडावर शेंगांना कोंब फुटल्यामुळे पिकाची नासाडी झाली होती. शेतकऱ्यांनासुद्धा डाळीपुरतेही मूग झाले नव्हते. त्या पिकांना लावलेला खर्च पूर्ण वाया गेला होता. दरम्यान मूग, उडीद या पिकाचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण केले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
अनेक शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी
यावर्षी खरीप हंगामातील पेरणी केली.
परिसरात जुलै महिन्यात मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने काही शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली आल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फुले-शेंगा लागल्या असताना २२ दिवसांची पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी पिकाला वाचवण्याकरिता तुषार सिंचनाद्वारे पाणीसुद्धा दिले होते.
मुगाचे उत्पादन घटणार
बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाच्या शेंगा भरल्या असून, काही शेतकऱ्यांच्या मुगाच्या शेंगा वाळत आहेत. या आठवड्यात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्याला पूर आले होते. तेव्हापासून रिमझिम कमी-अधिक जास्त पाऊस पडत असल्याने मुगाच्या झाडाच्या शेंगांना कोंब फुटत असल्याने एक-दोन दिवसांत पाऊस न थांबल्यास गतवर्षीसारखा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.