पाऊले चालती पंढरीची वाट! मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी: संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

By ब्रह्मानंद जाधव | Published: June 6, 2023 05:20 PM2023-06-06T17:20:55+5:302023-06-06T17:21:09+5:30

हा पालखी सोहळा मलकापूर, मोताळा मुक्काम करून राजूर मार्गे ५ जून रोजी सायंकाळी बुलढाणा शहरात दाखल झाला

Muktainagar to Pandharpur Ashadhi Vari: Welcoming Saint Muktabai's Palkhi at Buldhana | पाऊले चालती पंढरीची वाट! मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी: संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

पाऊले चालती पंढरीची वाट! मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी: संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

googlenewsNext

बुलढाणा : पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ... अशा भक्तीमय गितांनी वारकरी पंढरपूरला पावलो पावली जवळ करत आहेत. श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा ६ जून रोजी बुलढाण्यातून चिखलीकडे रवाना झाला. संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे बुलढाणा शहर परिसरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा २ जूनपासून मुक्ताईनगर येथून सुरू झाला आहे.

हा पालखी सोहळा मलकापूर, मोताळा मुक्काम करून राजूर मार्गे ५ जून रोजी सायंकाळी बुलढाणा शहरात दाखल झाला. शहरातील हनुमान मंदिर जुनागाव येथे मुक्कामासाठी येताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्यात खान्देश, मध्यप्रदेश, विदर्भ व इतर भागातून हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत भोजन व निवासाची सोय सुनिल पांडे, शैलेंद्र कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली आहे. संत मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा ६ जून रोजी सकाळी हातणी मार्गे चिखली येथे मुक्कामासाठी रवाना झाली. बुलढाणा शहरातून ६ जून रोजी निघालेल्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

चिखली येथे मुक्काम
श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा ६ जून रोजी चिखली येथे मुक्काम आहे. त्यानंतर ७ जून रोजी भरोसा फाटा, ८ जून रोजी देऊळगाव मही, ९ जून रोजी देऊळगाव राजा येथे मुक्काम राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातून नंतर पालखी जालना बीड मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

३१४ वर्षांची परंपरा
आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगरसोबत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची ३१४ वर्षापासूनची परंपरा आहे. मध्यप्रदेश खान्देश विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. ७०० किमीचे अंतर ३३ दिवसात ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता पिढ्यान् पिढ्या वारी चालू आहे.

बुलढाण्यातील वातावरण झाले भक्तीमय
बुलढाणा शहरात मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड, गवळणी आणि वारकऱ्यांची शिस्त व पांढरी शुभ्र बैलजोडी सोबत रथाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Web Title: Muktainagar to Pandharpur Ashadhi Vari: Welcoming Saint Muktabai's Palkhi at Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.