देऊळगाव राजा नगर पालिकेच्या तत्कालीन नगर सेविकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 01:52 PM2022-08-31T13:52:01+5:302022-08-31T13:52:18+5:30

कुठलीही शहानिशा न करता मृत्यूचा दाखला देणे देऊळगाव राजा नगर पालिकेच्या तत्कालीन नगर सेविकच्या चांगलेच अंगलट आले आहे़

municipal corporator of Deulgaon Raja Municipal Corporation arrested | देऊळगाव राजा नगर पालिकेच्या तत्कालीन नगर सेविकेला अटक

देऊळगाव राजा नगर पालिकेच्या तत्कालीन नगर सेविकेला अटक

googlenewsNext

गजानन तिडके

देऊळगाव राजा (बुलढाणा): कुठलीही शहानिशा न करता मृत्यूचा दाखला देणे देऊळगाव राजा नगर पालिकेच्या तत्कालीन नगर सेविकच्या चांगलेच अंगलट आले आहे़ या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने तत्कालीन नगर सेविका दीपमाला नवनाथ गोमधरे यांना जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी पाेलिसांनी ३० ऑगस्ट राेजी अटक केली़ या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे़

जालना येथील बाबुराव नागोजी सतकर यांच्या मालकीची शेती जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा शिवारात आहे. सदर शेत जमिनीच्या सातबारावर देऊळगाव राजा येथील त्यांच्या नातेवाईकांनी बनावट मृत्यू दाखला देऊळगाव राजा नगरपालिकेत तयार करून परस्पर नाव नोंदवून घेतले होते. यासाठी तत्कालीन नगरसेविका दीपमाला नवनाथ गोमधरे यांच्या सही शिक्याचा वापर करून द्रुपताबाई सतकर यांचा मृत्यू दाखला जोडण्यात आला होता. 

या प्रकरणात बाबुराव सतकर राहणार जालना यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद नोंदवून बनावट कागदपत्राच्या आधारे शेत जमिनीवर नाव नोंदवून फसवणूक केल्याप्रकरणी मे महिन्यात टेंभुर्णी पोलिसात तक्रार दिली होती़ या प्रकरणी पोलिसांनी महेश सतकर,जितेंद्र सतकर, विष्णू सतकर,ताराबाई सतकर,मृत्यूचा दाखला देणाऱ्या नगर सेविका दीपमाला गोमधरे व पालिका कर्मचारी राजू अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणात मागील आठवड्यात महेश सतकर,जितेंद्र सतकर व विष्णू सतकर यांना पोलिसांनी अटक केली होती. ३० ऑगस्ट रोजी सकाळी टेंभुर्णी पोलिसांनी माजी नगरसेविका दीपमाला गोंमधरे यांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़ या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे यांनी करीत आहेत.

उच्च न्यायालयाने फेटाळला अटक पूर्व जामीन
टेंभूर्णी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा मे महिन्यात दाखल केल्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविला होता़ त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपींचा जामीन फेटाळल्याने या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़

Web Title: municipal corporator of Deulgaon Raja Municipal Corporation arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.