पालिकेच्या महास्वच्छता अभियानाला प्रारंभ; महिनाभर राबविणार मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 03:44 PM2018-12-04T15:44:28+5:302018-12-04T15:45:23+5:30
बुलडाणा : आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छता व डेंग्यूच्या मुद्यावर गंभिरतेचा इशारा दिल्यानंतर नगर पालिकेने महास्वच्छता अभियान सुरु केले आहे.
बुलडाणा : आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छता व डेंग्यूच्या मुद्यावर गंभिरतेचा इशारा दिल्यानंतर नगर पालिकेने महास्वच्छता अभियान सुरु केले आहे. सोमवारी औपचारिकस्तरावर या मोहिमेला प्रारंभ झाला. जवळपास महिनाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बुलडाणा पालिकेने महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला डेंग्यू मुद्यावर चांगलेच खडसावल्यानंतर पालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचा ठेका औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील सृष्टी बेरोजगार एंटरप्रायजेस या संस्थेकडे आहे. साथीच्या आजाराचा फैलाव होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. बांधकामाचे टाके, जनावरांचे गोठे, विहिरींमध्ये गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. सोमवारी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. मुख्य बाजारपेठ, जयस्तंभ चौक, संगम चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यासोबतच शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांच्या उपस्थितीत साफसफाई करण्यात आली.
शुन्य कचरा नियोजन
स्वच्छ शहर, सुंदर शहर ही ओळख कायम ठेवण्यासाठी पालिकेने 'शुन्य कचरा' नियोजन हाती घेतले आहे. शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील १७ प्रभागामध्ये २५ घंटागाड्या कार्यरत आहेत. सोबतीला पाच ट्रॅक्टरही ठेवण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून दररोज २५ मेट्रीक टन कचरा उचलला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
एक दिवसाआड राबविणार मोहिम
महास्वच्छता अभियानाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. जवळपास महिनाभर एक दिवसाआड ही मोहिम राबविण्यात येणार आहे. नालेसफाई, कचरा उचलणे, जनजागृती करणे या मुद्यांवर भर देण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा गोळा करण्यात येणार आहे. महास्वच्छता अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले आहे.