मेहकरातील नगर पालिकेच्या शाळेला आग, विद्यार्थ्यांचे पेपर्स जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 09:18 AM2019-06-23T09:18:29+5:302019-06-23T13:29:40+5:30
मेहकर: स्थानिक पोलिस स्टेशनच्या समोरील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील लोखंड लंपास करुन अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना रविवारी ...
मेहकर: स्थानिक पोलिस स्टेशनच्या समोरील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेतील लोखंड लंपास करुन अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे जुने पेपर जळून खाक झाले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नगरपरिषदेची शाळा क्रमांक २ आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एका खोलीतील जुने लोखंडी साहित्य लंपास केले. तर दुसºया खोलीतील दहा वर्षापूर्वीचे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकांना आग लावून फरार झाले. आगीत खोलीतील सर्व पेपर जळून खाक झाले. शाळेला आग लागल्याची माहिती मुख्याध्यापिका संध्या मोरे यांना मिळताच त्यांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. पालिकेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी, पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. (शहर प्रतिनिधी)
यापूर्वीही घडला शाळेचे कुलूप तोडण्याचा प्रकार
शाळेत दररोज रात्री काही चिडीमार व काही लोक दारू पिऊन धिंगाणा करतात. यापूर्वीही तीन ते चार वेळा शाळेचे कुलूप तोडण्याचे प्रकार घडले आहेत. दारू पिऊन धिंगाणा घालणाºयांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मुख्याध्यापिका संध्या मोरे यांनी केली आहे.