दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल

By अनिल गवई | Published: August 20, 2024 03:25 PM2024-08-20T15:25:56+5:302024-08-20T15:26:18+5:30

Buldhana News: खामगाव तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी मंगळवारी दुपारी दिला.

Murder of shopkeeper; Three brothers sentenced to life imprisonment, verdict of Khamgaon Sessions Court | दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल

दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल

-अनिल गवई 
खामगाव - तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी मंगळवारी दुपारी दिला.

तक्रारीनुसार, माक्ता येथील राजेश नामदेव कळसकार याच्याकडून आरोपी सोपान ज्ञानदेव साबे, एकनाथ ज्ञानदेव साबे यांनी त्यांच्या बहिणीच्या लग्नाकरिता पन्नास हजार रुपये उसने घेतले. लग्नानंतर पैसे परत करण्याचे किंवा सोपान साबे याच्या ताब्यात असलेला प्लॉट राजेशला देण्याचे ठरले होते. मात्र बहिणीच्या लग्नानंतरही आरोपींनी राजेशला प्लॉट तर दिला नाही, तसेच पैसेही परत केले नाहीत. त्यावरून राजेश व सोपान साबे व एकनाथ साबे यांच्यात वाद झाला.

दरम्यान,८ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास या वादातूनच एकनाथ, सोपान, निवृत्ती ज्ञानदेव साबे यांनी तलवार, लोखंडी रॉड व चाकू अशा शस्त्रांच्या साहाय्याने राजेश कळसकार याच्यावर हल्ला चढवला. घटनेच्या वेळी राजेश याचा १२ वर्षीय मुलगा दुकानात डबा घेऊन पोहोचत असतानाच ही घटना घडली. दरम्यान, एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना राजेशचा रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३०२, ५०६, ३४ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम ३ व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला.

तपासाअंती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र सादर केले. दोषारोप सिद्ध करताना एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यादरम्यान फिर्यादी मरण पावला, त्यामुळे त्याची साक्ष नोंदविता आली नाही. घटनास्थळ पंचनाम्यातील साक्षीदार फितुर झाल्यानंतरही सरकारी वकिलांनी घेतलेल्या उलट तपासणीत अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर सिद्ध झाले. मृताचा मुलगा व स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय अधिकारी गौरव गोयंका, डॉ. प्रशांत वानखडे यांची साक्ष खटल्यादरम्यान अत्यंत महत्त्वाची ठरली. तलवार व लोखंडी रॉडमुळे मृताला झालेल्या जखमा होऊ शकतात हे शवविच्छेदन अहवालाद्वारे निसंशय सिद्ध झाले.

खटल्यात युक्तीवाद करताना, सरकारी वकील वसंत भटकर यांनी विविध उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयांच्या २० पेक्षाही अधिक निकालपत्रांचा संदर्भ दिला. आरोपी एकनाथ (३२), सोपान (३४), निवृत्ती (४४) या आरोपींना कलम ३०२, ३४ भादंवि खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा, तर दंड न भरल्यास सहा महिने अधिकची शिक्षा ठोठावली, तर आरोपी एकनाथला कलम ४, २५ भारतीय शस्त्र कायद्यानुसार सुद्धा दोषी ठरवून २ वर्षे कारावास, ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींनी दंडाची रक्कम भरल्यास एकूण ३५ हजार रुपये प्रकरणातील पीडितांना देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. खटल्या दरम्यान, अति. सरकारी वकील क्षितिज अनोकार व पोलिस स्टेशन खामगाव ग्रामीणचे न्यायालयीन पैरवी अधिकारी महिला पो.कॉ. चंदा शिंदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Murder of shopkeeper; Three brothers sentenced to life imprisonment, verdict of Khamgaon Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.