रस्त्यावर मुरूम, महसूल विभागाकडून पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:25+5:302021-05-03T04:28:25+5:30
अर्धवट रस्त्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर १३ एप्रिलला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी बुलडाणा ...
अर्धवट रस्त्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर १३ एप्रिलला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी बुलडाणा जिल्हा कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. डोणगाव येथील अर्धवट खडीकरण केलेल्या कामाची चौकशी करून संबंधित एजन्सीवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. यावर २३ एप्रिलला मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना या कामाची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु ही चौकशी होण्याआधीच २७ एप्रिलला या रस्त्यावर अचानक मुरूम टाकणे सुरू झाले. ही बाब काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांना समजताच त्यांनी तेथे भेट देऊन अवैध मुरुमाबाबत चौकशी केली असता हा मुरूम विना रॉयल्टी असल्याने या परिसरात राहणाऱ्यांनी आम्ही टाकला नसून रात्रीच्या वेळी कोणीतरी टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शैलेश सावजी यांनी या रस्त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे या रस्त्यावर मुरूम येऊन पडला असला तरी हा रस्ता पूर्ण करून संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांनीही मुरूम ग्रामपंचायतने रस्त्यावर टाकला नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा मुरूम रस्त्यावर कोणी आणून टाकला, रात्रीतून डोणगांवातील अर्धवट खडीकरण झालेल्या रस्त्यावर मुरुमाचा पाऊस पडला कसा, असा प्रश्न निर्माण झाला असताना २८ एप्रिलला महसूल विभागाच्या वतीने डोणगाव तलाठी यांनी या मुरुमाचा पंचनामा करून तहसीलदार मेहकर यांना सादर केला. दरम्यान, ज्यांना मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, ते अद्यापही चौकशीला न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.