मस प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’च्या मार्गावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:14 AM2020-07-27T11:14:09+5:302020-07-27T11:14:18+5:30
मस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आठवडाभरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सात मध्यम प्रकल्पापैकी चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६५ टक्क्यावर जलसाठा आहे. मस प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातूनही गेल्या ५६ तासांपासून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
दमदार पावसामुळे पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्प ७० टक्क्याने भरला आहे. तर सर्वाधिक मस प्रकल्पामध्ये जलसाठा आहे. पाटबंधारे उपविभाग खामगांव यांचे अंतर्गत सिंचन शाखा हिंगणा कार्यक्षेत्रातील जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मस १०० टक्के पाण्याने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात येणार आहे. या सांडव्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातूनही सध्या दोन हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या उर्ध्व भागात तथा पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला होता.
परिणामी हा मोठा प्रकल्प ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरला. त्यामुळे पूर नियंत्रणाकरीता प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. त्यानुसार नदीकाठावरील जिल्ह्यातील १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. प्रकल्पातून पूर्ण १९ वक्रद्वारे ६० से. मी. ने उघडून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदी पात्रात सोडण्यात आला. सध्या धरण पाटबंधारे विभागाच्या नियमांनुसार उद्दिष्टपातळी पर्यंत आले असल्यामुळे धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
तीन तालुक्यांना आधार
खडकपूर्णाचे चार गेट अद्यापही चालू आहेत. दोन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. ५६ तासांपासून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील कोल्हापूरी बंधारे भरण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांतील भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे.
या गावांना सतर्कतेचा इशारा
मस नदीकाठावरील हिंगणा, कारेगांव, संभापूर, शेंद्री, लासूरा जहा, उमरा लासूरा व चितोडा या गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पूर आल्यास ही नदीकाठावरील जिल्ह्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग यांनी या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला.