गौरी गणेशाचे मुस्लिम ‘सेवा’धारी; कृतीशिलतेतून ‘सर्वधर्म समभावा’ची जोपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:59 PM2018-09-17T17:59:26+5:302018-09-17T18:18:40+5:30
खामगाव : शहरातील एक मुस्लिम बांधव गौरी-गणेशाचा ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ‘सेवा’धारी बनला आहे. कृतीशील सहभागातून मनोभावे गौरी गणेशाची सेवा करतानाच ‘सर्व धर्म समभाव’ या राष्ट्रधर्म संकल्पनेची जोपासना त्यांच्याहातून होतेय.
- अनिल गवई
खामगाव : शहरातील एक मुस्लिम बांधव गौरी-गणेशाचा ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ‘सेवा’धारी बनला आहे. कृतीशील सहभागातून मनोभावे गौरी गणेशाची सेवा करतानाच ‘सर्व धर्म समभाव’ या राष्ट्रधर्म संकल्पनेची जोपासना त्यांच्याहातून होतेय. ‘कृपे’मुळेच हे सर्वकाही घडत असल्याची ‘त्यांची’ भावना असली तरी, धर्माच्या ‘भींती’ पाडण्यासाठी त्यांची ‘सेवा’ अनुकरणीय ठरतेय.
खामगाव येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशमुख कुटुंबांकडे उस्मान खान (७८) बालपणापासून कामाला आहेत. वामनराव देशमुख यांच्याकडे सुरूवातीला साधी-साधी कामे करणारे उस्मान खान ‘मुनीम’जी या पदापर्यंत पोहोचले. देशमुख कुटुंबांच्या चौथ्यापिढीचे साक्षीदार असलेले ‘उस्मान’भाई शिवाजीराव देशमुखांच्या घरातील एक सदस्य कधी बनलेत, याचा कुणालाही सुगावा लागलाच नाही. इतकेच नव्हेतर घरातील कामे करताना त्यांच्याहातून तब्बल ६५ वर्षांपासून देशमुखांच्या घरातील गौरी-गणेशाची सेवा घडतेय. पूजा साहित्याची ने-आण करण्यापासून ते देशमुखांच्या घरातील नवीन सुनांना कुळाचार परंपरेची माहिती देण्यात ते आता सराईत झाले आहेत. आपल्या अष्टपैलू गुणांमुळे उस्मानभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देशमुख यांच्या गळ्यातील ‘ताईत’ बनल्याची प्रतिक्रीया देवेंद्र देशमुख यांनी दिली.
खाकी वर्दीतील ‘सेवा’धारी!
‘जातीच्या भींती पाडायच्या असतील, तर सर्व धर्म समभावा’ची ‘नाती’ निर्माण व्हावीत. अशी धारणा असलेल्या खाकी वर्दीतील ‘सेवा’धाºयाने खामगावात सर्व धर्म समभावाच्या जोपासनेचा नवीन पायंडा पाडलाय. हिंदू धर्म...हिंदू संत आणि आधात्माबाबतच्या प्रचंड अभ्यासामुळे ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक रफीक शेख अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेत. कोणत्याही धर्माच्या कार्यक्रमात त्यांचा सकारात्मक पुढाकार ही स्तुत्य बाब ठरतेय. अनिकट रोडवरील ठाकरे यांच्या घरी आयोजित ‘महालक्ष्मी’च्या प्रसादावेळी रफीक शेख यांनी चक्क पंगतीत वाढ केली. सामाजिक दरी दूर करण्यासाठी त्यांची ही कृतीशिलता वाखाणन्याजोगी अशीच आहे, असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरणार नाही.
आजेसासू, सासूबाई आणि सासरे यांच्याप्रमाणेच कुळाचार परंपरा मला उस्मानभाई यांच्याकडून सांगण्यात येते. देशमुख घराण्याची सून झाल्यापासूनच घरातील धार्मिक कार्यात उस्मानभाई यांची मोलाची मदत झालीय.
- शीतल देशमुख, खामगाव.
कृपेमुळे माझ्याहातून ‘सेवा’ घडतेय. देशमुखांच्या घाटपुरी येथील शेतात काम करताना घाटपुरी येथील देवीची कृपा आपल्यावर झाली. पुढे घरातील गौरी-गणपती, पोळा, दिवाळी आणि नवरात्रीत पूजेचे सामान आणताना देवाविषयी गोडी निर्माण झाली. सर्वांमध्ये एकच ईश्वर असल्याचा प्रत्यय आपणाला येतो.
- उस्मान खान, खामगाव.