‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:33+5:302021-08-21T04:39:33+5:30
महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. ...
महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ‘माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मेहकर तालुक्यातील ई-पीक पाहणीची सुरुवात तहसीलदार संजय गरकल यांनी १९ ऑगस्ट रोजी शेलगाव देशमुख सांझ्यातील तालुक्याचे प्रगतिशील शेतकरी शरद शिवप्रसाद केळे यांचे शेतातून केली. यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरून पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कसे अपलोड करावयाचे याबाबतचे मार्गदर्शन स्वत: तहसीलदार संजय गरकल यांनी केले. संबधित शेतकऱ्यांचा पीक पेरा प्रत्यक्ष शेतात भरून घेतला. मेहकर तालुक्यातील सर्वच गावामध्ये ई- पीक पाहणीची सुरुवात झाली असून, स्वत: तहसीलदार यांनी शेलगाव देशमुख सांझ्यातील शेतकरी शरद केळे, सुनंदा किसन खंडारे यांच्या बांधावर जाऊन ऑनलाईन पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी काळे, विस्तार अधिकारी मेटांगळे, ग्रामविकास अधिकारी डी. पी. काळे, शिवाजी पंडागळे, तलाठी अशोक शेजुळे, बालाजी तिरके, लिपिक महादेव कड्डक, ग्रामरोजगार सेवक विष्णू आखरे, कोतवाल किशोर पातुरकर, भगवान बघे, शरद केळे, दिलीप आखरे, रंजित पाटील, अशोक म्हस्के, एकनाथ खराट, विनोद गोरे, विनोद ताकतोडे व शेतकरी बांधव उपस्थित होते. ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधून आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पिकाची परिस्थिती, बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेऊन त्यांचे छायाचित्र अपलोड करू शकतात. संबंधित तलाठी यांचे लॉगिनवरून त्याला मान्यत: मिळाल्यानतर ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत करण्यात येते.
असे आहेत ॲप्सचे वैशिष्ट्य
हा ॲप हाताळण्यासाठी अत्यंत सोपा असून, ॲंड्रॉईड फोनवरुन मराठी भाषेमधून माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरुन १० शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करता येते. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर ‘ई- पीक पाहणी’ या नावाने सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध असून, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अद्ययावत करावी असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले.