म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही, जिल्ह्यात ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:22+5:302021-05-29T04:26:22+5:30
सामान्यत: दुर्मीळ असा हा बुरशीजन्य आजार आहे. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार करून घेणे आवश्यक आहे. ...
सामान्यत: दुर्मीळ असा हा बुरशीजन्य आजार आहे. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी जागरूक राहून उपचार करून घेणे आवश्यक आहे. ही बुरशी जमिनीत, खतामध्ये, सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि निरोगी व्यक्तीच्या नाकांत व नाकाच्या स्रावातदेखील आढळते. ज्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याची भीती असते. ज्यांना स्टेरॉईडची औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, ज्यांचा मधुमेह अनियंत्रित आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे, जुनाट किडनी किंवा लिव्हरचा आजार आहे, अशांना याचा धोका अधिक असतो.
--ही आहेत प्राथमिक लक्षणे--
डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम होणे ही प्रामुख्याने लक्षणे असू शकतात. त्यामुळे शंका आल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
--जिल्ह्यात २९० इंजेक्शन उपलब्ध--
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारासंदर्भातील औषधी तसेच गरजेनुरूप २९० इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासगी रुग्णालय किंवा मेडिकल स्टोअर्समध्ये जिल्ह्यात ही इंजेक्शने उपलब्ध नाहीत.
--जिल्ह्यात आतापर्यंत ३७ रुग्ण सापडले असून ११ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. --
--ही घ्या काळजी--
नियमित गरम पाण्याची वाफ घ्या, मिथिलीन ग्लू हे १० एमएल अैाषध १ लिटर पाण्यात टाकून त्याने नाक स्वच्छ केले तरी चालते. सोबत रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवा, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावा.
--कोट--
म्युकरमायकोसिस आजार हा संपर्कामुळे होणारा आजार नाही. वेळेत निदान व उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो.
(डॉ. सचिन वसेकर, कोविड समर्पित रुग्णालय, बुलडाणा)