दोन ग्रा.पं.ला नगरपंचायतीचा दर्जा
By admin | Published: March 6, 2015 01:50 AM2015-03-06T01:50:53+5:302015-03-06T01:50:53+5:30
मोताळा व संग्रामपूर ग्रामपंचायत बरखास्त; तहसीलदारांकडे प्रशासक पदाची सूत्रे.
बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर या दोन तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाने आता नगर पंचायतीचा दर्जा दिला आहे. नगर विकास विभागाने ४ मार्च रोजी तशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने यापूर्वी अभिप्राय मागितले होते. त्यानुसार या दोन्ही ग्रामपंचायतीने ह्यनाहरकत प्रमाणपत्रह्ण जिल्हा प्रशासनाला दिले होते. आता ४ मार्च रोजी राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने अधिसूचना जारी करून या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक अधिनियम १९६५ कलम ३४0 च्या पोट कलम (२) मधील खंड (इ) व कलम ३४१ क द्वारे नव्याने गठीत मोताळा व संग्रामपूर या नगरपंचायतींची उक्त अधिनियमान्वये रचना होईपर्यंंत तहसीलदार मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यातील १३0 तालुक्यातील ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर या दोन ग्रामपंचायतींचा समावेश होता. दरम्यान, राज्यात लोकसभा व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या गदारोळात नगर पंचायतींचा विषय प्रलंबित राहिला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुन्हा नगरपंचायतींचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दोन्ही ग्रामपंचायती आता बरखास्त झाल्या असून, प्रशासक म्हणून तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार मोताळा नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून मोताळ्याचे तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तर संग्रामपूरचे तहसीलदार सचिन खल्याळ यांच्याकडे पदभार देण्यात आले.