लोणारात काँग्रेसचा तर सिंदखेड राजात शिवसेनेचा नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:41 PM2019-03-26T13:41:41+5:302019-03-26T13:41:48+5:30
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काहीशी रंगीत तालिम म्हणून बघितल्या गेलेल्या लोणार, सिंदखेड राजा पालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी होणाऱ्या परिवर्तनाची परंपरा खंडित झाली आहे.
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काहीशी रंगीत तालिम म्हणून बघितल्या गेलेल्या लोणार, सिंदखेड राजा पालिका निवडणुकीत दर पाच वर्षांनी होणाऱ्या परिवर्तनाची परंपरा खंडित झाली आहे. लोणारमध्ये कॉंग्रेसचा नगराध्यक्ष तर सिंदखेड राजात शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.
लोणारमध्ये काँग्रेसच्या पूनम पाटोळे यांनी पाच हजार १६६ मते घेत भारिप बहुजन महासंघाच्या मनिषा वाघमारे यांचा पराभव केला तर शिवसेनेच्या सुनीता राजगुरू या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचे सतीश तायडे हे पाच हजार ६५२ मते घेऊन नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवीदास ठाकरे यांचा पराभव केला.
दरम्यान, लोणारमध्ये १७ नगरसेवकांपैकी दहा नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आले असून, शिवसेनेला सात नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे सिंदखेड राजा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, शिवसेनेचे सात, भाजपचा एक आणि अपक्ष एक असे १७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक मतदान प्रक्रिया होण्यापूर्वीच अविरोध निवडून आला होता. या दोन्ही पालिकांचे वैशिष्ट्य म्हणजे दर निवडणुकीत येथे सत्ताधाऱ्यांविरोधात कौल दिला जात होता; परंतु यंदा लोणारात काँग्रेसने आपली पालिकेतील सत्ता कायम ठेवली तर सिंदखेड राजात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.