नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती करणार सरोवराची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:33 AM2020-06-17T10:33:42+5:302020-06-17T10:34:19+5:30
नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करणार आहे.
बुलडाणा: खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या रंग बदलासंदर्भात संशोधन करून दोन आठवड्यात अहवाल करण्याचे निर्देश १५ जून रोजी नागपूर खंडपीठाने दिले आहे. यासंदर्भात नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करणार आहे. यावेळी न्यायमुर्ती अनिल किलोरही प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
मंगळ आणि चंद्रावरील विवराप्रमाणे लोणार सरोवर असून ते पृथ्वीतलावरील एक अनोखे विवर आहे. लोणार सरोवरात पाण्याखाली ग्लास टॉप फॉर्मेशन झाल्याचा अंदाज नासाचे शास्त्रज्ञ शॉन राईट यांचा अंदाज आहे. त्यानुषंगाने लोणार सरोवर संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतंर्गत प्रतिवादी पक्षाचे वकील अॅड. आनंद परचुरे यांनी १५ जून रोजी अनुषंगीक बाब खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. योगायोगाने सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्यामुळे निरीचे पथक येथे नमुने घेण्यासाठी आले आहे. त्यामुळे ग्लास टॉप फॉर्मेशन संदर्भातही काही माहिती मिळते का? या दृष्टीने येथे संशोधन करण्यास सध्या वाव आहे. त्यामुळे निरीने प्रयत्न करावेत, असे १५ जूनच्या सुनावनी दरम्यान युक्तीवादात अॅड. परचुरे यांनी म्हंटले आहे. आता खुद्द न्यायमुर्ती अनिल किलोरच लोणार येथे पाहणीठी येत असल्याने त्यासंदर्भात काही हालचाल होण्याची शक्यता आहे.
त्यानुषंगाने १५ जून रोजीच खंडपीठाने एक समिती स्थापन केली असून त्यानुषंगाने अॅड. सी. ए. कॅप्टन, प्रदुषण मंडळाचे ए. एस. सन्याल आणि एस. सी. धर्माधिकारी तथा प्रकरणात प्रतिवादी पक्षाचे वकील अॅड. आनंद परचुरे हे ही १७ जून रोजी लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी येत आहे. यासंदर्भात स्वत: अॅड. परचुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लॉ आॅफीसर अॅड. गजानन पद्ममने यांनीही त्यास दुजोरा दिला. १७ जून रोजी सकाळी ११ ते २:३० दरम्यान ही समिती लोणार येथे पाहणी करणार आहे.
सरोवरातील पाणी पातळीही मोजण्याचे आदेश
पावसामुळे गेल्या काही दिवसात सरोवराची पाणी पातळी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भाने सिंचन विभागाने सरोवराच्या पाण्याची पातळी नियमित पणे मोजावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत. यासोबतच किन्ही रस्ता जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे त्याला पर्यायी रस्ता शोधण्याबाबतही खंडपीठाने आदेशीत केले आहे.