नळगंगा प्रकल्पामुळे दुष्काळावर मात!
By admin | Published: April 6, 2016 12:17 AM2016-04-06T00:17:28+5:302016-04-06T00:17:28+5:30
मोताळा तालुक्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ‘नो प्रॉब्लेम’.
मोताळा (बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली, तरी जिल्हय़ातील सर्वात मोठा असलेल्या नळगंगा प्रकल्पात ३१ ऑक्टोबर २0१६ पर्यंत पुरेल इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मोताळा-मलकापूर तालुक्यातील ४0 ते ४५ गावांचा पाणीप्रश्न सहा महिन्यापर्यंत मिटला असून, दुष्काळाची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे.
तालुक्यातील नळगंगा प्रकल्पातून मोताळा व मलकापूर तालुक्यातील जवळपास ४0 ते ४५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ३0 कि. मी. कालव्याची लांबी असलेल्या या धरणामधील जलाशयाची पातळी २८४.३0 मीटर आहे. सद्यस्थितीत ६.७७ दलघमी. (९.७६ टक्के) इतका उपयुक्त पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. तालुक्याला वर्षभरासाठी सरासरी ६८८.६ मिमी पावसाची आवश्यकता असते. नळगंगा धरणातून दरवर्षी ४ दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केल्या जातो. यावर्षी १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत २. ७0 दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केलेला आहे. आज रोजी आरक्षित जलसाठा ६. ७७ दलघमी. इतका असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, सिंचनासाठी शेतकर्यांना पाणी बंद केलेले आहे. परतीच्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने दगा दिल्याने सिंचनासाठी शेतकर्यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.