नली एक हृदयस्पर्शी एकलनाट्य: देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:13+5:302021-09-03T04:36:13+5:30
येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयाने बुधवारी श्रीमती अरुणाताई कुल्ली यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त नली या एकलनाटकाचा प्रयोग आभासी पद्धतीने आयोजित ...
येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयाने बुधवारी श्रीमती अरुणाताई कुल्ली यांच्या मासिक स्मृतिदिनानिमित्त नली या एकलनाटकाचा प्रयोग आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत देशमुख बोलत होते. श्रीकांत देशमुख यांच्या पडझड वाऱ्याच्या भिंती या लेखसंग्रहातील नलिनी देवराव या व्यक्तिरेखेचे शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर करून योगेश पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी सादर केलेला नलीचा एकलनाट्याचा प्रयोग अनेकांना भावला. नाट्य प्रयोगापूर्वी प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा सुजाता कुल्ली यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. की. वा. वाघ यांनी केले. नली हे एकलनाट्य असूनही बहुपात्री होणारी ही संहिता नाट्याशयाचे सौंदर्य हर्षल पाटलांच्या समर्थ अभिनयाने ताकदीने उभे केल्याबद्दल प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांनी हर्षल पाटील यांचे कौतुक केले. नली या नाट्यप्रयोगानंतर शंभू पाटील, श्रीकांत देशमुख, हर्षल पाटील, सुरेश साबळे, शशिकांत इंगळे, डॉ. सदानंद देशमुख, नरेंद्र लांजेवार, संदीप राऊत, युवराज कापरे, रविकिरण टाकळकर आदींनी आपले नाट्यप्रयोगाबाबतचे मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. डॉ. की. वा. वाघ यांनी मानले.
नाट्यप्रयोगाला रसिकांची साद
या नाट्यप्रयोगाला रसिकांची चांगली साद मिळाली. नली या एकलनाट्याचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी परिवर्तन संस्था जळगाव, अजिंक्य क्यावल, संदीप राऊत, ऋषिकेश क्यावल आणि प्रगती वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या नाट्यप्रयोगाला बहुसंख्येने रसिक मोठ्या प्रमाणावर आभासी पद्धतीने उपस्थित होते.