नांदुरा-ब-हाणपूर आता राष्ट्रीय महामार्ग!
By admin | Published: February 4, 2016 01:38 AM2016-02-04T01:38:00+5:302016-02-04T01:38:00+5:30
चौपदरीकरणाला मंजुरी; दोन राष्ट्रीय महामार्गांच्या नकाशावर जळगाव.
नानासाहेब कांडलकर/ जळगाव: मुंबई ते कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणारा नांदुरा-जळगाव जामोद ते बर्हाणपूर या आंतरराज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. ८६ कि.मी. अंतराच्या या रस्त्याच्या चौपदीकरण कामाला मंजुरी मिळाली असून, नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष या कामास प्रारंभ होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी यास दुजोरा दिला असून, या रस्त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जळगाव जामोद शहर हे मोक्याच्या ठिकाणी येणार आहे.
यापूर्वी नांदेड ते बर्हाणपूर या रस्त्यालासुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. नांदेड, हिंगोली, वाशिम, पातूर, बाळापूर, शेगाव, वरवट , संग्रामपूर, जळगाव जामोद ते बर्हाणपूर असा दोन प्रांतांना जोडणार्या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याचेसुद्धा चौपदीकरण अपेक्षित आहे. तसेच हैद्राबाद ते नांदेड हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व मध्य प्रदेश अशा तीन प्रांतांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव जामोद शहरातून जात असतानाच आता नांदुरा, जळगाव जामोद ते बर्हाणपूर या रस्त्यालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने जळगाव जामोद हे शहर आता दोन राष्ट्रीय महामार्गांवर येणार आहे. नांदुरा, जळगाव जामोद ते बर्हाणपूर या रस्त्याच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन मागील आठवड्यात जळगाव खान्देश येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडल्याचीही माहिती आ.डॉ. संजय कुटे यांनी दिली. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांमुळे जाणे आणि येणे अंतर सुमारे १५0 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे हैद्राबादकडून इंदोरकडे जाणारी व नागपूर, अमरावतीवरून खंडवा व इंदूरकडे जाणारी सर्व वाहने भविष्यात याच रस्त्याने जाणार असल्याने जळगाव, संग्रामपूर व शेगाव या शहरांसह या तीन तालुक्यांनासुद्धा विशेष महत्त्व प्राप्त होऊन विकासाला व व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.