नांदुरा : शेतकर्यांनी पुन्हा बंद पाडले महामार्गाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:30 AM2018-02-03T00:30:16+5:302018-02-03T00:30:33+5:30
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन शेतीचा मोबदला पुरेसा देत नसून, प्रत्येक शेतकर्याची शेती वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याचा आरोप करीत १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग नांदुरा बायपासचे काम पुन्हा शेतकर्यांनी बंद पाडले.
किशोर खैरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन शेतीचा मोबदला पुरेसा देत नसून, प्रत्येक शेतकर्याची शेती वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याचा आरोप करीत १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग नांदुरा बायपासचे काम पुन्हा शेतकर्यांनी बंद पाडले.
राष्ट्रीय महामार्ग ६ चा नांदुरा बायपास तालुक्यातील १२ शिवारातून जात असून, त्याचे काम २८ जानेवारी रोजी सुरू होताच ज्यांची शेती नॅशनल हायवेत जात आहे अशा सर्व शेतकर्यांनी आज एकत्रित येऊन त्यांनी नॅशनल हायवेच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले होते. त्यानंतर नॅशनल हायवेचे इंजिनिअर निखिल सिंग हे शेतकर्यांसोबत चर्चा करून निघून गेले; परंतु योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकर्यांनी पुन्हा १ फेब्रुवारी रोजी धर्मा पाटील या शेतकर्याला श्रद्धांजली वाहून पुन्हा आंदोलन केले.
आंदोलकांनी आपली प्रमुख मागणी शेतीचे फेर मूल्यांकन करून नवीन कायद्यानुसार अकोला, बाळापूर तसेच जळगाव खांदेशच्या पृष्ठभुमीवर योग्य तो मोबदला देण्यात यावा. तसेच नांदुरा बायपासमध्ये जाणारे जुने शेतरस्ते तयार करून द्यावे फळबाग, अकृषक जमीन, विहिरी बोअरवेल, मोटार पंप वनझाडे याचंही मूल्यांकन करून मोबदला मिळावा, यासाठी पुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकर्यांनी केला. त्यानंतर महसूल प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार गणेश पाटील, मलकापूरचे मार्कंड साहेब, ठाणेदार विलास पाटील यांनी शेतकर्यांशी चर्चा करून आंदोलन स्थगित केले; परंतु मोबदला न देता काम सुरू केल्यास ‘महाराष्ट्र शासना आता तरी जागा हो, आमच्या कष्टाच्या जमिनीची थोडी तरी जाण ठेव’, अशा घोषणा देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांदुरा तालुका राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीने दिला आहे.
शेतकर्यांमध्ये नगरसेवक अनंता भारंबे, अरूण नारखेडे, सत्यनारायण केला, छोटू तळोले, भगवान परळकर, स्नेहल नारखेडे, शशिकांत पाटील, राजू चोपडे, राजेंद्र डांगे, श्रीनिवास नारखेडे, गजानन तायडे, बबन जुनगडे, संजय भारंबे, नीलेश नारखेडे, राहुल ढवळे, अँड.ढवळे, अजय धामोडकर, दिलीप धामोडकर, विजय धामोडकर, गोपाल बानाईत, विष्णू धामोडकर, विजू पाटील, नितीन धामोडकर, भारत वसतकार यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.