नांदुरा : शेतकर्यांनी मोबदल्यासाठी महामार्गाचे काम पाडले बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:10 IST2018-01-29T01:04:19+5:302018-01-29T01:10:14+5:30
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्याची शेती शासन वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याने सर्व शेती शासनाच्या नवीन धोरणानुसार खरेदी करावी, अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली.

नांदुरा : शेतकर्यांनी मोबदल्यासाठी महामार्गाचे काम पाडले बंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असताना शासन संपादित जमिनीचा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप करीत संतप्त शेतकर्यांनी रविवार, २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा बायपासचे काम बंद पाडले. प्रत्येक शेतकर्याची शेती शासन वेगवेगळ्या भावाने खरेदी करीत असल्याने सर्व शेती शासनाच्या नवीन धोरणानुसार खरेदी करावी, अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चा नांदुरा बायपास नांदुरा खुर्द, खुदानपूर, नांदुरा बु. कोळंबा, वडाळी, खुनदानपूर या शिवारातून जात असून, त्याचे काम २८ जानेवारी रोजी सुरू होताच ज्यांची शेती राष्ट्रीय महामार्गात जात आहे, अशा सर्व शेतकर्यांनी एकत्रित येऊन काम बंद पाडले. प्रामुख्याने जुने वहिवाटीचे गाव रस्ते पूर्ववत सुरू करण्यासाठी छोटे पूल बांधणे, मोरी बांधून देणे किंवा पुलाखालून रस्ते कायम ठेवण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे, तर मलकापूर तालुक्यात १९00 रुपये स्क्वेअर मीटरने पैसे दिले असताना नांदुरा तालुक्यात १२0 ते ३५0 रुपये स्क्वेअर मीटरप्रमाणे पैसे देत आहेत. हा प्रकार नांदुरा तालुक्यातील शेतकर्यांवर अन्याय करणारा असल्याने मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकर्यांमध्ये व शेतीमध्ये अशी तफावत का, असा प्रश्न शेतकरी विचारात असून, सर्व शेतकर्यांना समान मोबदला नवीन नियमानुसार देण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.
रविवार सुटीचा दिवस असल्याने कोणताही अधिकारी या आंदोलनस्थळी उपस्थित नव्हता. तरी शासनाने सर्व शेतकर्यांना मलकापूरप्रमाणे नवीन धोरणानुसारच मोबदला द्यावा, अशी मागणी केली. शेतकर्यांमध्ये नगरसेवक अनंता भारंबे, छोटूभाऊ तळाले, निनाजी नारखेडे, गजानन नारखेडे, भगवान परळकर यांच्यासह अन्य सहभागी होते.