देशातील जनता ‘मोदीं’च्याच बाजूनेच ठाम - घाटाखालील तीनही आमदारांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 02:12 PM2019-05-23T14:12:20+5:302019-05-23T14:13:06+5:30
देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सतराव्या लोकसभेत बुलडाणा आणि रावेर लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार आघाडीवर असल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालिचा उत्साह संचारला आहे. त्याचवेळी देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे.
देशात, राज्यात आणि प्रत्येक लोकसभा मतदार संघात घराणेशाही विरोधात ‘विकास’ अशीच लढत झाली. या निवडणुकीत बुलडाणा आणि रावेर लोकसभा मतदार संघात युतीचे प्रतापराव जाधव आणि रक्षाताई खडसे आघाडीवर आहे. दुपारी २ वाजेपर्यंत प्रतापराव जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांच्यावर सुमारे ५० हजारांची आघाडी घेतली. तर रक्षाताई खडसे यांनीही त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतली. त्यामुळे युतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही ही घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास आ. अॅड. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती आणि आ. डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केला. देव-देश आणि धर्माच्या बाजूनेच जनता उभी राहील्याबद्दल त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.
देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’च्या बाजूनेच जनतेचा मूड आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही ‘मोदी’ सरकारच्याच दिशेने कौल दिला आहे. अनेक प्रकारच्या चर्चेनंतर जनतेने दिलेल्या ठाम निर्णयाचे स्वागत आहे. देव-देश आणि धर्म हितासाठी झालेल्या युतीच्या पाठीशीच जनता असल्याचे सिध्द झाले.
- चैनसुख संचेती
आमदार, मलकापूर विधानसभा मतदार संघ
मोदी आणि विकासाच्या बाजूनेच जनतेने कौल दिलाय. बुलडाणा लोकसभा मतदार संघातही युतीच्या बाजूनेच जनता उभी राहीली. काँग्रेसचा सुपडा संपूर्ण देशातून घराणे शाही हद्दपार झाली असून, युतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत फळास आल्याचे समाधान आहे.
- अॅड. आकाश फुंडकर
आमदार, खामगाव विधानसभा मतदार संघ
जनता युतीच्या पाठीशी असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. बुलडाणा लोकसभा मतदार संघातील जळगाव विधानसभेत युतीच्या उमेदवारांना आघाडी आहे. प्रत्येक सच्चा कार्यकर्त्यांच्या अहोरात्र परिश्रमाचे हे फळ आहे.
- डॉ. संजय कुटे
आमदार, जळगाव जामोद विधानसभा मतदार संघ