राष्ट्रीय पक्षी मोर वन्यजीव विभागाकडून दुर्लक्षित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:39+5:302021-02-17T04:40:39+5:30
लोणार : जंगलात लागणारा वणवा, कोरडे पाणवठे आणि अन्नाची वानवा यामुळे जंगलातील पक्षी, प्राण्यांचे जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. ...
लोणार : जंगलात लागणारा वणवा, कोरडे पाणवठे आणि अन्नाची वानवा यामुळे जंगलातील पक्षी, प्राण्यांचे जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये यावे लागत असल्याचे पाहावयास मिळते. अशाच विविध कारणांमुळे जागतिक पर्यटन लोणार सरोवरामध्ये अधिवास करत असलेला राष्ट्रीय पक्षी मोर सरोवर परिसरातील शेतामध्ये अन्न शोधत असल्याचा आढळून येत आहे.
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवरामध्ये मोर पक्षी मोठ्या संख्येने अधिवास करतात. मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळालेली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर जंगलांच्या किंवा झाडीच्या आसपास पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना शेतात मोर सहजपणे वावरताना आढळतात. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतात. मादीला म्हणजेच लांडोरीला पिसारा नसतो. एका मोराबरोबर अनेक लांडोरी थव्याने जंगलात तसेच शेतात दाणे टिपताना आढळतात. मोराचे अन्न पाने, किडे, सरडे, साप हे आहे. मोर हा सुंदर पक्षी असून आता दुर्मीळ होत चालला आहे तरीही लोणार वन्यजीव विभाग राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोर पक्षाच्या जतन व संवर्धन करण्यासंदर्भात गांभीर्यपूर्वक कार्य करत नसल्याची बाब समोर येत आहे. सरोवराच्या जंगलात राहणारे मोर पक्षी आता सरोवराच्या परिसरातील शेतात येऊ लागले आहेत. हे जंगलातील त्यांचे अन्न-पाण्याचे स्रोत संपत चालल्याचे द्योतक आहे. सरोवराच्या काठावरून मंठा व किनगाव जटटू मार्गावर भरधाव वाहने जातात. दरम्यान, रस्ता ओलांडताना अपघात होऊन पक्षी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माेरांची शिकार हाेण्याची शक्यता
लोणार तालुक्याला जंगलाचे वैभव लाभलेले आहे. तालुक्यातील जंगल परिसर वनविभागाच्या देखरेखीखाली आहे. जंगलात आढळणारे मोर पक्षीही गाव परिसरातील शेतात टोळीने अन्नाच्या शोधात येत असल्याने त्यांच्या शिकारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. सध्या परिस्थितीत शहर व गाव परिसरात, शेतात मोरांच्या झुंडी आढळत आहेत. इतर क्षेत्रांतही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.