राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला निकृष्टतेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:52 PM2019-02-13T17:52:26+5:302019-02-13T17:53:21+5:30
खामगाव : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरूवात करण्यात आली. यामध्ये बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा, टिळक पुतळा ते बस स्थानक चौक, बस स्थानक चौक ते टॉवर चौक आणि टॉवर चौक ते नांदुरा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान, सुरूवातीला सेंटरलाईन, विविध शासकीय कार्यालयांची परवानगी, भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम चर्चेत आले. त्यानंतर लागलीच कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पुन्हा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रकाश झोतात आले आहे. गेल्याच आठवड्यात कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शहर पोलिस स्टेशन आणि पालिकेचा पाणी पुरवठा प्रभावित झाला होता.
खामगाव पालिकेच्या व्यापारी गाळ्यासमोरील परिसरात नाली बांधकाम करताना पाईपलाईन फोडली होती. यासंदर्भात रस्त्याच्या चौपदरीकरणाचा कंत्राट असलेल्या जान्दू कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.
रस्त्याची संरचना करताना भेदभाव !
भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी न करताच रस्त्यांची संरचना करण्यात येत असल्याची नागरिकांची ओरड सुरूवातीपासूनच होत आहे. परिणामी, पालिकेने डिसेंबर महिन्यात काम थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र दिले होते. त्यानंतर वेळोवेळी पाईपलाईन फोडल्याप्रकरणी आणि पाईपलाईन स्थलांतरीत न केल्याप्रकरणी कंत्राटदाराला पालिकेने धारेवर धरले. त्याचवेळी मनमानी पध्दतीने संरचनेमुळे चौपदरीकरणाचे काम भेदभावपूर्ण होत असल्याची ओरड होत आहे. विकमसी चौक ते टिळक रस्त्याची संरचना करताना एका ‘हॉटेल’ व्यावसायिकास कंत्राटदाराकडून देण्यात आलेल्या झुकत्या मापाचा मुद्दा आता आणखी ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे नांदुरा रोडवरील एका बड्या व्यावसायिकाचे अतिक्रमणाला धक्का न लावण्याचा विषय सर्वसामान्यांमध्ये चर्चिल्या जात आहे.