पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर
By admin | Published: July 20, 2014 01:04 AM2014-07-20T01:04:56+5:302014-07-20T02:03:18+5:30
ग्रामीण बँकेने घेतली आघाडी : बुलडाणा जिल्ह्यात १७ हजार ३८८ शेतकर्यांना दिला कर्ज रूपांतरणाचा लाभ.
बुलडाणा : शेतकर्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करण्यात राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांचा हात आखडताच असल्याची बाब १५ जुलैअखेर शेतकर्यांना झालेल्या कर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
जिल्ह्यात जवळपास १८ राष्ट्रीयीकृत बँका असून, २0१४-१५ च्या खरीप हंगामासाठी ७६ हजार ४४४ शेतकरी खातेदारांना खरिपासाठी १0५ कोटी रुपये कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४३ कोटी ३६४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून, ही आकडेवारी कर्जवाटपाच्या उद्दिष्टाच्या ३९ टक्के झाल्याचे दर्शवित आहे. यावरून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांची शेतकर्यांना कर्ज पुरवठा करण्यात हात आखडण्याचीच भूमिका राहिली असल्याचे त्यांनी १५ जुलैअखेर पूर्ण केलेल्या कृषी कर्ज पुरवठय़ाच्या आकडेवारीवरून दिसून येते. या कर्जवाटपात चांगली अवस्था ग्रामीण बँकेची असली तरी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती ६६ टक्क्यांच्या पुढे सरकली नाही. यापेक्षा थोडी चांगली अवस्था सिंडिकेट बँकेची असली तरी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती ८९ टक्क्यांच्या पुढे सरकली नाही. तर उर्वरित बँकांपैकी बँक ऑफ ओरियन्टल या बँकेने ६६ टक्के, बँक ऑफ इंडिया या बँकेने ६१ टक्के, तर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने ५१ टक्के कर्ज पुरवठा केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाला जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याची माहिती आहे. एकीकडे पाऊस नाही, दुसरीकडे कर्ज मिळाले नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी वर्ग आहे.
* बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस
बुलडाणा जिल्ह्यात आज सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. चिखली तालुक्यातील उंद्री, धाड परिसरातील रुईखेड मायंबा, सिंदखेडराजा, चिखली तालुका तसेच डोणगाव परिसरात दिवसभर रिमझिम पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. येणार्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास ठिंबकद्वारे लावलेली पिके धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.