वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे!
By admin | Published: March 18, 2016 02:08 AM2016-03-18T02:08:09+5:302016-03-18T02:08:09+5:30
जीपीएस प्रणालीद्वारे पाठवली जाते मोताळा वनपरिक्षेत्रातील जलस्त्रोतांची माहिती.
मोताळा (जि. बुलडाणा): बहुतांश जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उन्हात आटत असले तरी मोताळा वनपरिक्षेत्रातील पाणवठय़ांमध्ये पाण्याची उपलब्धता आहे. वन विभागातील अधिकार्यांच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले असून, बिटनिहाय याचा अहवाल जीपीएस प्रणालीद्वारे वरिष्ठांना पाठविला जात असल्याने जंगलातील पाणवठय़ाची प्रत्यक्ष स्थिती त्यांना त्यांच्या कार्यालयातच पाहावयास मिळते.
बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, लोणार व ज्ञानगंगा अशी तीन अभयारण्ये आहेत. यापैकी ज्ञानगंगा अभयारण्याची व्याप्ती सर्वाधिक असून, मोताळा तालुक्याच्या वनपरिक्षेत्राचा यात समावेश आहे. मोताळा वनपरिक्षेत्रात ११ हजार ३६५ हेक्टरवरहून अधिक वनक्षेत्र आहे. ११ बिट आणि तीन वतरुळांचा यामध्ये यात समावेश आहे. राजूर वतरुळात सहा, रोहिणखेड तीन व मोताळा वतरुळात दोन बिट आहेत. जंगलात मौल्यवान वनसंपदेबरोबरच बिबट, अस्वल, कोल्हा, लांडगे, निलगाय, काळवीट, हरिण, रानमांजर यांसह अन्य प्राणी या वनपरिक्षेत्रात वास्तव्यास आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७00 मि.मी. आहे. तथापि, मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जंगलातील पाणवठे तग धरू शकणार नसल्याचे बोलले जात होते. याशिवाय वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होण्याची दाट शक्यता लक्षात घेता, याबाबत माहिती घेतली असता, राजूर, रोहिणखेड व मोताळा वतरुळामध्ये कृत्रिम पाणवठय़ाची निर्मिती व नैसर्गिक पाणवठय़ाबाबत दक्षता घेतली असल्याचे वन विभागाकडून सांगितले गेले. वन विभागाकडून प्रत्येक बिटमध्ये पाणवठे बांधलेले असून, राजूर बिटमध्ये सहा पाणवठे आहेत. माणसांचे जंगलातील वाढलेले अतिक्रमण, पावसाचे कमी प्रमाण, शिकारीसुद्धा वन्यप्राण्यांवर पाळत ठेवत असल्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. वन्य प्राण्यांसाठी लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होत नसल्याने काही प्रमाणात वन विभाग याबाबत संवेदनशील नसल्याचे जाणवते; मात्र मोताळा वनपरिक्षेत्रामधील प्रत्येक बिटमध्ये असलेल्या पाणवठय़ांमध्ये पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.