माेहाडी रस्त्याला तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:12+5:302021-06-29T04:23:12+5:30
साखरखेर्डा : मोहाडी फाटा ते गाव रस्त्यावर रविवारी झालेल्या पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले ...
साखरखेर्डा :
मोहाडी फाटा ते गाव रस्त्यावर रविवारी झालेल्या पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले असून, त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यावर उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.
माेहाडी फाटा ते गाव हा रस्ता दोन किमी अंतराचा असून गावाशेजारी या रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना गावात प्रवेश करणे कठीण झाले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या या रस्त्यावरील साचत असलेल्या पाण्याला वहिवाट काढावी अशी मागणी सरपंच अशोक रिंढे यांनी केली आहे.
मोहाडी फाटा ते गावापर्यंत पक्का रस्ता झालेला आहे. गावाजवळ एक वळण असून टेकडीवरील पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे. या पाण्याला नैसर्गिक नाला होता; परंतू रस्त्यालगत झालेल्या बांधकामामुळे पाण्याला वहिवाट राहिली नाही. साखरखेर्डा मंडलात एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने रस्त्याची या पावसाने वाट लागली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे हा रस्ता असून बांधकाम विभागाने या रस्त्यावर साचत असलेल्या पाण्याला वहिवाट काढावी. या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साचत असल्याने गावात प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर चिखलही झाला आहे. या पाण्याला नालीवाटे वहिवाट काढावी अशी मागणी सरपंच अशोक रिंढे यांनी करत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे.