प्रतीक्षेनंतर ‘नवोदय’चा निकाल जाहीर; ८० विद्यार्थ्यांची यादी घोषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:09 PM2018-08-10T17:09:47+5:302018-08-10T17:12:48+5:30
बुलडाणा : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे
बुलडाणा : जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाभरातून नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांची यादी घोषीत करण्यात आली असून पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होत असतानाही राज्यातील सहा जिल्ह्यात इयत्ता सहावीचा नवोदय परिक्षांचा निकाल प्रलंबीत होता. बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय परिक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये २७ जुलै रोजी ‘नवोदय परीक्षेचा निकाल रखडला’ असे वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत निकालाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून करण्यात आल्या. त्यानंतर ८ आॅगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याचा ‘नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ८० विद्यार्थ्यांची यादी नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आली आहे. यामध्ये ५१ मुले व २८ मुलींचा समावेश आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यानंतर नवोदयची परीक्षा दिलेल्या सहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतू विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेऊन शैक्षणीक शुल्कही भरलेला आहे. त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयासाठी प्रवेश निश्चीत झाला त्यांना शाळांमध्ये भरलेली फी परत न मिळण्याच्या व इतर अडचणी येऊ शकतात. निकाल लागल्यानंतर १० दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने सध्या नवोदय विद्यालयाकडून हालचाली सुरू आहेत.