राष्ट्रवादीचा बुलडाण्याच्या जागेवर दावा कायम; शरद पवारांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:32 PM2018-08-28T16:32:22+5:302018-08-28T16:47:19+5:30
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभेच्या जिल्ह्यातील एकंदर स्थितीबाबत कोअर कमिटीमधील सदस्यांकडून बुलडाणा लोकसभेचा सविस्तर आढावा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे
- निलेश जोशी
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभेच्या जिल्ह्यातील एकंदर स्थितीबाबत कोअर कमिटीमधील सदस्यांकडून बुलडाणा लोकसभेचा सविस्तर आढावा घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, या प्रक्रियेमुळे बुलडाणा लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेने दावा कायम ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याशी संपर्क साधला असता त्याने ही या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील अकोला व बुलडाणा लोकसभा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आदलाबदल करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा लगाम लागला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या या बैठकीमध्ये तब्बल चार तास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर चर्चा झाली. त्यामध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघासंदर्भात १५ ते २० मिनीट चर्चा होऊन शरद पवार यांनी स्वत: सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका या प्रसंगी एप्रिल-फेब्रुवारी महिन्यातच होण्याची शक्यता पाहता अनुषंगीक बाबींची पक्षाची चाचपणीही करण्यात येऊन लोकसभा व विधानसभा एकत्र होण्याची शक्यताही या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तपासून पाहली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
काँग्रेसही बुलडाणा लोकसभा मतदार संघ लढविण्यासाठी इच्छूक आहे. त्यामुळे मतदार संघ बदलासंदर्भातील चर्चा पुढील टप्प्यात काय वळण घेते, हे येणारा काळच ठरवणार आहे. मुंबईतील बैठकीत सध्याच्या सत्ताधार्यांना रोखण्यासाठी विखुरलेले पक्ष एकत्रीत आणून आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. सोबच काँग्रेसला ५०-५० जागा देण्याबाबतच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. मात्र आघाडीत भारिपला स्थान देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नकारात्मक असल्याचेही सुत्रांनी सांगितले.