सेनेच्या शिवसंवादात राष्ट्रवादीची घोंगडी पोहचली गावागावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:30+5:302021-07-27T04:36:30+5:30
बुलडाणा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी राजकीय पक्ष मरगळ झटकून कामाला लागले आहेत. ग्राम पातळीवर संघटनात्मक ...
बुलडाणा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी राजकीय पक्ष मरगळ झटकून कामाला लागले आहेत. ग्राम पातळीवर संघटनात्मक बांधणीसाठी हे पक्ष अलर्ट झाले आहेत. शिवसेनेकडून शिवसंवाद अभियान राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या घोंगडी बैठकाही गावागावात होत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शांत बसलेले हाेते. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली होती.परंतू आता राज्य शासनाने नियम शिथिल केले असल्याने राजकीय पक्षांनीही आपले कार्यक्रम वाढविले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर काही दिवसातच कोराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही, याबाबत सांगता येणार नाही. या निवडणुकाबाबत अद्याप निश्चिती नसली, तरी राजकीय पक्षांनी मात्र जोमाने कामाला सुरूवात केली आहे. शिवसेनेकडून जिल्हाभर संपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादीकडून गावागावात घोंगडी बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये नवीन मतदारांचे नाव नोंदविणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती गण, विभागामार्फत संपर्क मोहीम राबविणे, गावागावात शाखेचे फलक लावणे, नविन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येत आहे. आपल्या पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहचविणे, कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य गावागावात पोहचविण्यासाठी राजकीय पक्ष आता अलर्ट झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या घोंगडीने युवक आकर्षित
राष्ट्रवादीचे विचार गावागावात पोहचविण्यासाठी १५ जुलैपासून घोंगडी बैठक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे बुलडाणा तालुकाध्यक्ष डी.एस. लहाने यांची संकल्पना असलेल्या घोंगडी बैठकांनी युवकही आकर्षित झाले आहेत. आतापर्यंत बुलडाणा तालुक्यातील २६ गावात घोंगडी बैठका झाल्या असून, १० ऑगस्टपर्यंत हे अभियान चालणार आहे. जवळपास ५०० युवकांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दररोज तीन गावांमध्ये ही बैठक होते. त्यामध्ये गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना राष्ट्रवादीचे विचार सांगण्याची कामे केली जातात.
शिव संपर्क अभियानाने राजकीय वातावरण तापले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हाती घेतलेल्या शिवसंपर्क अभियानाने राजकीय वातावरण तापले आहे. शिव संपर्क अभियानाच्या कार्यक्रमातून थेट भाजपवर निशाणा साधला जात आहे. युवासेना सचिव सचिन सरदेसाई यांचा कार्यक्रमही चर्चेचा ठरला. या संवाद कार्यक्रमातून मेहकर येथे खा. प्रतापराव जाधव यांनी भाजपने विश्वासघात केल्याचा टोला मारून राजकीय वातावरण गरम केले आहे.