स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; मुख्यमंत्र्यांवर होणार स्मरणपत्रांचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:45+5:302021-09-02T05:14:45+5:30
प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची माहिती सिंदखेडराजा : “आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे ...
प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांची माहिती
सिंदखेडराजा : “आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे. देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला ‘हीरक महोत्सव’ म्हणून संबोधणे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही,” अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून पाठवले जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी येथे ३१ ऑगस्ट रोजी दिली.
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलेच शाब्दिक द्वंद्व रंगले आहे. मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचेदेखील पाहायला मिळत असताना भाजपची गांधीगिरी समोर येत आहे. आता देशाचा यंदाचा स्वातंत्र्य दिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव, यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गोंधळ झाला. त्यानंतर आता देशाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप ७५ हजार पत्रे पाठविणार आहे.
या अभियानाची सुरुवातही झाली आहे. देश कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला. त्यानंतर आता भाजप पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देणार आहे. उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता युवा मोर्चा ७५ हजार पत्रे लिहिणार आहे.